करदात्यांना मोठा धक्का! Old Tax Slab प्रणाली होणार बंद; कोणतीही सूट मिळणार नाही
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा।।वाढत्या महागाईत आता सरकारने करदात्यांना (Taxpayers) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण सरकार जुनी कर प्रणाली (Old Tax Slab) बंद करण्याचा विचार करत आहे. ज्यामध्ये सध्या करदात्यांना 70 प्रकारची सूट उपलब्ध आहे. महसूल सचिव तरुण बजाज यांच्या मते, इनकम टॅक्सच्या जुन्या प्रणालीमध्ये करदात्यांचे आकर्षण कमी करण्याची गरज आहे. यामुळे अधिक लोकांना नव्या इनकम टॅक्स प्रणालीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळेल.
इनकम टॅक्सची नवी प्रणाली 2020 मध्ये सुरु झाली. यामध्ये टॅक्सचा दर भले कमी असला तरी डिडक्शनची सुविधा उपलब्ध नाही. सूट न मिळाल्यामुळे करदात्यांनी नव्या टॅक्स प्रणालीमध्ये स्वारस्य दाखवले नाही. बहुतेक करदाते जुन्या इनकम टॅक्स प्रणालीमध्ये आयकर रिटर्न दाखल करतात.
सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षात नवीन कर प्रणाली आणली. ही कर प्रणाली अतिशय सोपी असल्याचे सांगण्यात आले. वैयक्तिक करदात्यांना यामध्ये कराचा दर कमी आहे. पण, त्यांना स्टँडर्ड डिडक्शन आणि सेक्शनची 80C ची सुविधा मिळत नाही. स्टँडर्ड डिडक्शन आणि सेक्शन 80C च्या सुविधेने कराचा बोजा कमी होतो.
5 लाखांपर्यंतच्या कमाईवर कोणताही टॅक्स नाही
नव्या कर प्रणालीनुसार, 5 ते 7.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना 10 टक्के टॅक्स भरावा लागेल. जुन्या इनकम टॅक्स प्रणालीमध्ये या उत्पन्नावर 20 टक्के टॅक्स भरावा लागत होता. तथापि, सेक्शन 87A अंतर्गत उपलब्ध सवलतीमुळे वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंत कमाई करणार्या लोकांना नवीन किंवा जुन्या नियमांतर्गत कोणताही कर भरावा लागणार नाही.
8.5 लाख कमाईवरही टॅक्स नाही
बजाज यांनी सांगितले की, पर्सनल इनकम टॅक्स कमी करण्यासाठी सरकारने नवीन प्रणाली आणली आहे. पण, फार कमी लोकांनी त्यात रस दाखवला आहे. याचे कारण असे आहे की, लोकांना वाटते की, एखाद्या प्रणालीमध्ये ते 50 रुपयांनीही कमी कर भरतील, मग त्यांना तीच प्रणाली वापरायची आहे. देशातील 80C आणि स्टँडर्ड डिडक्शनचा वापर करणाऱ्या आणि 8-8.5 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना कोणताही कर भरावा लागत नाही. यामुळेच लोक नवीन इनकम टॅक्स प्रणाली वापरू इच्छित नाहीत, असे ते म्हणाले. त्यामुळे जुन्या इनकम टॅक्स प्रणालीचे आकर्षण कमी केल्याशिवाय नवीन इनकम टॅक्स प्रणाली लोक वापरणार नाहीत.