भाजपा आमदार करणार मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार,
परप्रांतियांचा मुद्दा तापणार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई(वृत्तसंस्था)। साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या चैकशीसाठी बैठक घेताना परप्रांतियांची नोंद ठेवावी लागेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे, असा आरोप भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात समता नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य १०० टक्के घटनेच्या विरोधी आहे. बलात्काराच्या चौकशीसंबंधी बैठक घेताना परप्रांतीय लोकांवर नजर ठेवावी लागेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री करतात. बलात्कार करणाऱ्याच्या बाबतीत त्याचा धर्म कोणता, जात कोणती, त्याचा प्रांत कोणता हे बघून आरोपी ठरवणार का? असा सवाल भातखळकरांनी उपस्थित केला.
स्वतःला कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नाही. तुमच्या मांडीला मांडी लावून बलात्कारी मंत्री बसले आहेत. ते महाराष्ट्रीयन आहेत की परप्रांतीय? तुमच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर आरोप होतात. महिलेने आरोप केले की त्यांना तुरुंगात टाकले जाते, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तसेच सेनेच्या कितीतरी पदाधिकाऱ्यांवर आरोप आहेत आणि त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. ते काय परप्रांतिय आहेत का? मुख्यमंत्र्यांना ते दिसत नाही का? असेही ते म्हणाले. तसेच भारतीय फौजदारी दंड संहितेचं कलम १५३ अ यांच्याअंतर्गत दोन समाजात द्वेष पसरविणे याबाबत तक्रार दाखल करणार, असल्याचे भातखळकरांनी सांगितले.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला हात घातला असून महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. माता भगिनींची टिंगल टवाळी करणे आणि त्यांच्यावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. राज्यात बाहेरून कोण येतो, कोठून येतो, कोठे जातो याची नोंद ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयात झालेल्या गृह विभागाच्या आढावा बैठकीत दिले आहेत.