भाजपाशासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलवर व्हॅट केला कमी, महाराष्ट्रात कधी होणार?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। दिवाळीमध्ये केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कर कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल पाच तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. या कर कपातीमुळे महागाईमध्ये होरपळणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएमधील नऊ भाजपाशासित राज्यांनी केंद्राचा कित्ता गिरवत व्हॅट कर कमी केला आहे.
आसाम सरकारने बुधवारी पेट्रोल-डिझेलवर व्हॅट सात रुपयाने कमी केला आहे. बिहार सरकारनेही तोच कित्ता गिरवला आहे. बिहारने पेट्रोलवरील व्हॅट १.३० पैशांनी तर डिझेलवरील व्हॅट १.९० पैशांनी कमी केला आहे.
कर्नाटक सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कर ७ रुपयाने कमी केला आहे. कर्नाटकमध्ये प्रतिलिटर पेट्रोल आणि डिझेल सात रुपयांनी स्वस्त होणार आहे. यामुळे तिजोरीला २,१०० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी टि्वटमधून ही माहिती दिली. कर्नाटकमध्ये आता प्रतिलिटर पेट्रोलासाठी ९५.५० आणि डिझेलसाठी ८१.५० रुपये मोजावे लागतील.
“बिहारमध्ये प्रतिलिटर पेट्रोल ६.३० पैसे आणि डिझेलमध्ये ११.९० पैशांनी स्वस्त होईल” भाजपाचे राज्यसभा खासदार आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी ही माहिती दिली. गोव्यामध्येही व्हॅट कर सात रुपयांनी कमी होणार आहे. त्यामुळे गोव्यात प्रतिलिटर डिझेल १७ रुपये आणि पेट्रोल १२ रुपयांनी स्वस्त होणार आहे.
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिपलब देव यांनी पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट सात रुपयांनी कमी केला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी प्रतिलिटर पेट्रोलवरील व्हॅट २ रुपयांनी केली केल्याचे जाहीर केले. पण डिझेलबद्दल त्यांनी काहीही म्हटलेले नाही. मणिपूर, उत्तर प्रदेशमध्ये व्हॅट कमी होईल. त्यामुळे पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार आहे. केंद्राने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कर कमी केल्यानंतर राज्यांनीही व्हॅट कमी करुन जनतेला दिलासा दिला. आता महाराष्ट्रात व्हॅट कर कधी कमी होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा