ब्रेकिंग ; निवडणूक तारखात बदल, २ जि. प. व १०६ नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। स्थगित झालेल्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषदांमधील जागांच्या निवडणुकांसाठीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार ओबीसीतून खुल्या प्रवर्गात गेलेल्या या जागांसाठी १८ जानेवारीला मतदान होईल. तर १९ जानेवारी रोजी त्याचा निकाल जाहीर केला जाईल. यापूर्वी २१ डिसेंबर रोजी मतदान होऊन २२ डिसेंबर रोजी मतमोजणीच्या तारख्या जाहीर झाल्या होत्या. मात्र आता त्यात बदल करण्यात आला असून या जाहीर झालेल्या सर्वच निवडणूका पुढील वर्षात होतील.
सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला स्थिगिती दिली होती. तसेच सध्या जाहीर झालेल्या १०६ नगर पंचायतींच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) घेण्याचे आदेश दिले होते. मात्र अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोर्टाचे आदेश आल्याने ही प्रक्रियाच चुकीची असल्याचे मत अनेक राजकीय पक्षांनी मांडले होते, तसेच निवडणूका पुढे ढकलण्याची विनंतीही निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने या निवडणूका पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील १०६ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील ४ रिक्तपदांच्या आणि ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींतील ७ हजार १३० रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या ६ डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे सुरू आहे.
ओबीसींचा इम्पिरीकल डेटा गोळा होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारने केली होती. कॅबिनेटमध्ये तसा ठराव झाला होता. तरीही आयोगाने राज्य सरकारची विनंती न ऐकता निवडणूका पुढे ढकलल्या आहेत.