सावधान २-४ आठवड्यांतच कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात; कोविड टास्क फोर्सने केलं सावध
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। एकिकडे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळालं आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कोरोना लॉकडाऊन हटवला जात आहे. निर्बंध शिथील केले जात आहेत. पण तुम्ही मात्र तुमचे हत्यार बाजूला ठेवू नका. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढायला तयार राहा. फक्त २-४आठवड्यांतच महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. कोविड टास्क फोर्सने याबाबत सावध केलं आहे.
राज्यातील तिसऱ्या लाटेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली. राज्यातील कोविड टास्क फोर्सने या बैठकीत सावधानतेचा इशारा दिला आहे. असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
टास्क फोर्सने सांगितलं, तिसऱ्या लाटेत एकूण कोरोना प्रकरणं, अॅक्टिव्ह केसेस दुसऱ्या लाटेपेक्षा दुप्पट होऊ शकतात. अॅक्टिव्ह केसेस आठ लाखांपर्यंत पोहोचू शकतात. यापैकी १० टक्के प्रकरणं लहान मुलं, तरुण किंवा वृद्ध व्यक्ती असू शकतात. पण लहान मुलांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. निम्न मध्यम वर्गाला या लाटेचा जास्त धोका आहे कारण पहिल्या दोन लाटेपासून ते वाचले आहेत किंवा त्यांच्यातील अँटीबॉडीज कमी झाल्या असाव्यात.टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं, कोरोना प्रोटोकॉलचं पालन करायला हवं. राज्यात ब्रिटनसारख्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. जिथं दुसरी लाट कमी व्हाययच्या चार आठवडे आधीच तिसरी लाट आली.कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोना व्हायरसचा व्हेरिएंट डेल्टा प्लस हा राज्यात तिसऱ्या लाटेत शिरकाव करण्याची शक्यता आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्येही या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या खूपच जास्त होती. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेतही रुग्णांची संख्या जास्त असण्याची शक्यता जास्त आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य सरकारनं आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.