महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। नैऋत्य मोसमी वारे भारतातून परत जाऊन एक महिना पूर्ण होत आहे. असे असले तरी सध्या दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय आहे. त्यामुळे पुढील एक आठवडा दक्षिण भारतात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने (IMD) नुकताच पुढील चार आठवड्यांचा हवामान अंदाज वर्तवला होता. त्यानुसार, किमान पुढील आठवडा महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर देशात ईशान्य मान्सूनचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.
आजपासून ईशान्य मान्सून सक्रिय
पुढील आणखी काही दिवस राज्यात मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता आहे.त्यातही पुढील एक आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आजपासून 2 डिसेंबर पर्यंत दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सर्वात जास्त सक्रिय राहणार आहे.
त्यामुळे केरळ, तामिळनाडू, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश या भागात पुढील आठवड्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
3 डिसेंबरनंतर देशात ईशान्य मान्सूनचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
डिसेंबरच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात मान्सून सामान्य होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सोमवार-मंगळवार पुण्याला येलो अलर्ट
हावामान विभागाने सोमवारी (दि. 29) आणि मंगळवारी दि.30) रोजी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट परिसर आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
सोमवारी पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातार, सांगली आणि कोल्हापूर या 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
तर मंगळवारी नाशिक, ठाणे, अहमदनगर, पुणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.