“काँग्रेस नेत्यांची अवस्था जमीन नसलेल्या जमीनदारासारखी” शरद पवार यांचा काँग्रेस नेत्यांवर खोचक निशाणा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (वृत्तसंस्था)। देशातील काँग्रेस नेत्यांची अवस्था जमीन नसलेल्या जमीनदारांसारखी झाली असल्याचं खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केली आहे. विरोधकांच्या आघाडीला पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित होत नसल्यावरुन पवार यांनी ही टीका केली आहे. ‘मुंबई तक’शी बोलताना त्यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला.
सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विरोधकांसाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवार होऊ शकतात, असं काँग्रेस नेत्यांना सूचवल्यावर ते म्हणतात, ममता बॅनर्जीच का? आमच्याकडे राहुल गांधी आहेत, अशी त्यांची भूमिका असते” असा मुद्दा मुलाखत घेणाऱ्या संपादकांनी मांडला. त्यावर शरद पवार म्हणाले, “यापूर्वीही एकदा मी एक गोष्ट सांगितली होती. उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार होते, त्यांची मोठी शेती असते. गावात त्यांची मोठी हवेली देखील असते. लँड सीलिंगचा कायदा आला त्यात त्यांच्या मोठ्या शेतजमिनी गेल्या. अनेक लोकांमध्ये त्या वाटल्या गेल्या. पण त्यांची हवेली तशीच आहे गावात. या हवेलीची दुरुस्ती करण्याचीही आता त्यांच्यात ताकद राहिली नाही. त्यांच्या शेतीचं उत्पन्न पहिल्यासारखं राहिलं नाही. त्यांच्याकडे आधी काही हजार एकर जमीन होती, ती आता पंधरा-वीस एकर राहिली. पण सकाळी जेव्हा हा जमिनदार आपल्या हवेलीतून बाहेर पाहतो आणि आजूबाजूला पाहून हे सर्व माझं होतं. माझं होतं पण आता नाहीए ना! अशी अवस्था काँग्रेस नेत्यांची झालीए”
काँग्रेस नेत्यांची मानसिकता सांगताना पवार म्हणाले, “काँग्रेस पक्षातील नेते आपल्या नेतृत्वाबाबत वेगळी भूमिका घ्यायला तयार नसतात. कारण सुरुवातीला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेस होती. काँग्रेस नेत्यांमध्ये ही मानसिकता अजून कायम आहे. पण ही परिस्थिती एकेकाळी होती हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. ती स्विकारायची मानसिकता जशी तयार होईल, तशी इतर पक्षांसोबत त्यांची जवळीक वाढेल”