काँग्रेसचा नारा;महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। काँग्रेसने अखेर महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळ आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा किल्लाही काँग्रेस एकट्याने लढवणार आहे.
राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवा, असे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना दिले आहे. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर परस्पर निर्णय घेऊ नयेत. कसल्याही तडजोडी करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुका रंगतदार होणार आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कित्येक दिवसांपासून स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी ठाम होते. त्यांनी वारंवार घटक पक्षातील सहकाऱ्यांना कोंडीत पकडले होते. टीकाही केली होती. आता त्यांनी आक्रमक होत थेट आदेशच दिल्याने सारे चित्र स्पष्ट झाले आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुका आहेत. स्वबळ आजमावल्यास इथले चित्र वेगळेच असेल, हे नक्की.
महाआघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने पहिल्यांदाच स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे या आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष काय करणार, याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये आघाडी होणार का याचीही चर्चा रंगत आहे. मात्र, काल सातारा जिल्हा बँक निवडणुकीत झालेला प्रकार पाहता शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे ही शक्यता कमी वाटते.काँग्रेसच्या भूमिकेमुळे येणाऱ्या काळात भाजप-शिवसेना युती होणार का, या चर्चेलाही हवा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, दोन्ही पक्षात तूर्तास वाढलेला दुरावा पाहता, हे एवढे सोपे नाही. त्यामुळे युतीची शक्यता तशी धुसरच आहे.