कोरोना; राज्यात १५ मे नंतर लॉकडाऊन वाढणार ?
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई (वृत्तसंस्था)। कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहाता ४ एप्रिल पासून सरकारने करोना बाबतचे निर्बंध लागू केले होते. राज्य सरकारने लावलेले हे कठोर निर्बंध १ मे रोजी सकाळी ७ वाजता संपणार होते. त्यामुळे पुढे लॉकडाऊन असेल की नाही अशी चर्चा सुरू झाली होती. पण आता राज्यात लागू असलेले निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू करण्यात आल्यानंतर आता १५ मे नंतर लॉकडाऊन वाढणार ? की संपणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या बाबत खुलासा केला असून ते म्हणाले, ‘आम्ही लक्ष ठेवून आहोत. आता देखील रोज ५५ हजार ते ६० हजार नव्या रूग्णांची नोंद होत आहे. राज्यातील पॉझिव्हीटी रेट हवा तेवढा कमी होताना दिसत नाही. ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे. पण अद्यापही काही जिल्ह्यामध्ये संख्या कमी होत नाहीय, तर काही ठिकणी स्थिर असून काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढतच आहे.’ते पुढे म्हणाले की, ‘जिल्ह्यांमधील रूग्णांची संख्या लक्षात घेता लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल. येत्या १५ तारखेला लॉकडाऊनचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे १५ तारखेच्या दरम्यान लॉकडाऊन वाढवायचा की संपवायचा निर्णय घेण्यात येईल.’ असं देखील राजेश टोपे म्हणाले.