देशातील एकूण कोरोना मृत्यूंपैकी 20 टक्के मृत्यू हे महाराष्ट्र राज्यातून
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)।कोरोनाच्या या संकटामध्ये देशाची मोठी हानी केली आहे. या संकटामध्ये महाराष्ट्र राज्याचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला एकूण रुग्णांपैकी 60 टक्क्यांच्या आसपास रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात सापडत होते. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेतील परिस्थिती पाहता राज्यात तातडीने निर्बंध कडक करण्यात आले.
काल गुरुवारी कोरोनामुळे महाराष्ट्रात झालेल्या 650 मृत्यूनंतर महाराष्ट्रातील कोरोना मृतांची संख्या ही आता एक लाखांच्या पार गेली आहे. यामध्ये 2800 हून अधिक मृत्यूंचा समावेश आहे ज्याची नोंद इतर आजारांमुळे झालेला मृत्यू म्हणून राज्यात केली गेली आहे. कोरोना संकट सुरु झाल्यापासून काल गुरुवारपर्यंत 100,233 लोकांचा कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात मृत्यू झाला आहे. यामधील जवळपास अर्ध्या लोकांचा मृत्यू हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये झाला आहे. म्हणजेच 15 फेब्रुवारीनंतर यातील जवळपास अर्धे मृत्यू झाले आहेत. दुसरी लाट अद्यापही देशात कार्यान्वित आहे.
देशातील एकूण कोरोना मृत्यूंपैकी 20 टक्के मृत्यू हे आजही महाराष्ट्र राज्यातून होत आहेत. एकंदरीत, भारतामध्ये आजपर्यंत झालेल्या कोरोनव्हायरस संबंधीत मृत्यूंपैकी राज्यांचा वाटा हा जवळपास 30 टक्के राहिला आहे. हे प्रमाण संपूर्ण कोरोना महासंकटा दरम्यान जवळजवळ स्थिर राहिले आहे. राज्यामध्ये मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. मुंबईमधील आजवरच्या कोरोना मृत्यूंची संख्या ही जवळपास 15,000 आहे तर पुण्यामध्ये ती 12,700 च्या घरामध्ये आहे. ठाणे (8,000 हून अधिक) आणि नागपूर (6,500 हून अधिक) मध्ये देखील मोठ्या संख्येने मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात ज्याअर्थी सर्वाधिक कोरोना मृत्यू झाले आहेत, त्याअर्थी एकूण कोरोना रुग्णांची संख्या देखील राज्यामध्ये जास्त आहे. आतापर्यंत 58 लाख कोरोना संक्रमित रुग्ण राज्यामध्ये आढळले आहेत. देशातील सर्व रुग्णांमध्ये राज्याचा वाटा २० टक्के आहे तर देशातील एकूण सर्व मृत्यूंमध्ये 30 टक्के वाटा राज्याचा आहे.