शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर कोरोनाचा शिरकाव, २ रक्षक पॉझिटिव्ह !
मुंबई (वृत्तसंस्था)। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असललेल्या दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यापैकी एकही जण शरद पवार यांच्या संपर्कात आलेला नाही.
सिल्व्हर ओकवरील एकूण सहा जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये हे दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र त्यांचे कोरोना रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. कोरोना विषाणूने महाराष्ट्राला विळखा घातला असून त्यावर मात करण्यासाठी शरद पवार हे स्वतः गेल्या काही दिवसांपासून राज्यभर दौरे करत आहेत. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत त्यांनी सोलापूर, नाशिक, सातारा, रायगड जिल्ह्यात जाऊन कोरोना विरोधातील लढाईचा आढावा घेतला होता.
थेट सिल्व्हर ओकवरील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विशेष खबरदारी घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याचं समजते.