राज्यात पुन्हा शाळा बंद करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे संकेत
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। देशासह राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत पाहायला मिळतेय. यात मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात आोमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या सतत वाढतेय. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरत असल्याने सर्वाधिक नागरिकांना संसर्गाचा धोका निर्माण झालाय. अशा परिस्थितीतही राज्यातील शाळा १ डिसेंबरपासून सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. अनेक वर्षांपासून शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण होते. मात्र ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे शाळा पुन्हा बंद करु असे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, “राज्यातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या सतत वाढतेय. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद होण्यास सुरुवात झाली. आता हा आकडा ५० च्या पुढे गेलाय. ही वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यातील शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आमचे संपूर्ण परिस्थितीकडे बारकाईने लक्ष आहे.”
सध्या राज्य़ात ११ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आहेत. तर मुंबई ८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुबईहून नागपूरात पोहचलेले ४ प्रवासी पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांचे सँपल जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची एकूण रुग्णसंख्या ६५ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे देशातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात आहे. यामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या कोरोना टास्क फोर्सने फेब्रुवारी महिन्यात ओमिक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येईल. असा इशारा दिला. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री राजेश भूषण यांनी सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवत नाईट कर्फ्यू घोषित करा असे म्हणत युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात १ डिसेंबरपासून इयत्ता ५ ते १२ वीचे वर्ग सुरु झाले. त्यानंतर ग्रामीण भागांत १ ते ४ थी आणि शहरी भागांतील १ ली ते ७ वीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र ओमिक्रॉनमुळे देशात पुन्हा कोरोनाचे सावट निर्माण झाल्याने या विषाणूला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.