तुम्ही जरी कोरोनातुन बरे झाले असले तरी आधी तुमच्या ह्रदयाची काळजी घ्या, तुमच्या ह्रदयाला 20 रोगांचा धोका आहे
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। कोविडमधून तुम्ही बरे झाला आहात, तरीही आरोग्याच्या समस्या या काही सुटणाऱ्या नाहीत. कोरोनानंतर खरा धोका आहे तो तुमच्या ह्रदयाला.तुम्ही जर कोविडमधून बरे झाला आहात, आणि आपल्याला दिसणारी लक्षणं ही सौम्य होती तरीही तुमच्या ह्रदयाला कोरोना न झालेल्या माणसाच्या ह्रदयापेक्षा जास्त धोका आहे. कोरोना आणि ह्रदयाबाबत जे धोकादायक रोग आहेत त्याबाबत अमेरिकेत एक संशोधन करण्यात आले, त्या संशोधनाचा अहवाल नेचर मेडिकल या जनरलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनात काय मांडण्यात आले आहे, त्याची सविस्तर माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
सगळ्या जगावर कोरोनाचे संकट होते, त्या दोन वर्षाच्या संकटानंतर नेचर मेडिकलचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. कोरोनाचा ह्रदयावर होत असलेला परिणाम किती भयानक आहे, याचा सगळ्यात बारकाव्याने अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालामध्ये 110 लाख लोकांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला आहे. आणि त्याविषयी विस्ताराने त्यात मांडणी केली आहे.
शरीरावर कोरोनाचा दीर्घकाळ परिणाम
नेचर मेडिकलच्या अहवालामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मानवी शरीरावर कोरोनाचा दीर्घकाळ परिणाम होणार आहे. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांमध्येही याचा असर दीर्घकाळ झालेला दिसून येतो. नेचर मेडिकलचा अहवाल दोन वर्षानंतर प्रसिद्ध झाल्यानंतर ते असे म्हणतात की, 110 लाख लोकांच्या आरोग्याची तपासणी करुन हा अहवाल तयार केला आहे. ज्या नागरिकांना गेल्या दोन वर्षात कोरोना झाला आहे, त्यांच्याच ह्रदयाचा अभ्यास केला गेला आहे. आणि त्यांच्यासोबत ज्यांना कोरोना झाला नाही त्यांच्या ह्रदयाचाही अभ्यास करुन तुलनात्मकदृष्ट्या अहवालामध्ये मांडणी केली गेली आहे.
110 लाख लोकांच्या आरोग्याची तपासणी
नेचर मेडिकलनी हा अहवाल तयार करताना ज्यांच्यावर अभ्यास चालू आहे, त्यांचे वय, त्यांचे आरोग्य आणि त्यांना असणारा त्रास या गोष्टीबरोबच सिगारेट, दारूचे व्यसन करणाऱ्यांच्याही आरोग्याची तपासणी करुन अहवालामध्ये मांडणी केली आहे. संशोधन करणाऱ्या डॉक्टरांनी कोरोनाशी लढणाऱ्या माणसांच्या ह्रदयाचा जेव्हा अभ्यास केला त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की, ह्रदयाशी संलग्न असे 20 प्रकारचे रोग लोकांना झाले आहेत. त्यामध्ये अशा लोकांचाही समावेश आहे की, ज्यांची कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आली मात्र त्यांची लक्षणं सौम्य होती आणि रुग्णालयात दाखल न करता बरे झाले आहेत अशांनाही ह्रदयाचा त्रास झालेला आहे.
नेचर मेडिकलच्या अहवालानुसार आता हे सिद्ध झाले आहे की, एकदा कोरोना झाला की, त्याचा परिणाम दीर्घकाळासाठी राहतो, आणि शरीर स्थूल होते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवरही याचा परिणाम होतो.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा