एफडीएकडून ३५ लाखांचा विमल पान मसाला जप्त
मुंबई (वृत्तसंस्था)। विमल पान मसाला आणि व्ही-१ सुगंधित तंबाखू या राज्यामध्ये बंदी असलेले पदार्थ शुक्रवारी पहाटे नवी मुंबईतील ओयो सिल्व्हर की हॉटेलसमोर जप्त करण्यात आले. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३५ लाखांचा माल जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) दक्षता विभाग, अंमली पदार्थ विराधी कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांनी एकत्रितरित्या ही कारवाई केली.
राज्यामध्ये बंदी असलेले विमल पान मसाला आणि व्ही-१ सुगंधित तंबाखू परराज्यातून नवी मुंबईमध्ये आणण्यात येत असल्याची माहिती एफडीएला मिळाली. त्यानुसार एफडीएने नवी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विराधी कक्षासोबत महापेमधील एमआयडीसी येथील ओयो सिल्व्हर की हॉटेलसमोर सापळा रचला. ९ ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास तीन गाड्या येऊन हॉटेल समोर उभ्या राहिल्या. एफडीए व पोलिसांनी या वाहनांमधील व्यक्तींना ताब्यात घेत तपासणी केली असता वाहनातून विमल पान मसाला व व्ही-१ सुगंधित तंबाखू या राज्यात प्रतिबंधित असलेल्या पदार्थांचा ३५ लाख ५३ हजार ३१२ किंमतीचा साठा जप्त केला. वाहनांसोबत असलेल्या जीतेंद्र दास, अखाया खंडा, प्रियव्रत दास, जनार्दन यादव या व्यक्तींना अटक करत सर्व वाहने जप्त केली. या प्रकरणी आरोपींविरोधात अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम व भारतीय दंडसंहिता अंतर्गत गुन्ह्यासाठी प्रथम खबरी अहवाल नोंदवण्यात आला.
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर, आयुक्त अरुण उन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांच्या नियंत्रणाखाली अन्न सुरक्षा अधिकारी, एम. आर. घोसलवाड, डी.एस. महाले, व्ही.एच. चव्हाण यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या गोदामाबाबत अथवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन एफडीएचे सह आयुक्त सुनील भारद्वाज यांनी केले.