रेणू शर्मावर गुन्हा दाखल करा– भाजपच्या प्रदेशउपाध्यक्षा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, 22 जानेवारी : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते आणि यांची अखेर बलात्काराच्या आरोपातून सुटका झाली आहे. तक्रारदार रेणू शर्माने आपली तक्रार लेखी प्रतिज्ञापत्र देऊन मागे घेतली आहे. या प्रकारामुळे भाजपच्या प्रवक्ता चित्रा वाघ यांनी खोटी तक्रार दिल्या प्रकरणी रेणू शर्मावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
रेणू शर्माने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. या प्रकरणी भाजप नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण, आता रेणू शर्माने आपली तक्रार मागे घेतल्यानंतर भाजपने नवीन भूमिका मांडली आहे.
भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील तक्रारमागे घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘धनंजय मुंडे यांच्यावर जेव्हा बलात्काराचा आरोप झाला ही धक्कादायक बाब होती. पण आज बलात्काराची तक्रार मागे घेतली हे सुद्धा तितकेच धक्कादायक आहे. आम्ही या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु, आज रेणू शर्माने आरोप मागे घेतला आहे. त्यामुळे तिच्यावर कारवाई करणे गरजेचं आहे, अशी मागणीच चित्रा वाघ यांनी केली आहे.
‘एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप करायचे हा धक्कादायक प्रकार आहे. अशा पद्धतीने जर कुणी खोटे आरोप करत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारामुळे ज्या खऱ्या पीडिता आहे त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन हा वेगळा होऊन जातो. त्यामुळे खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर आयपीसी 192 नुसार मुंबई पोलिसांनी तिच्यावर कारवाई करावी, अशी विनंतीच चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांना केली आहे.