माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अटक होईल ; EDच्या हाती सर्व पुरावे
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। ”माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक झाली आहे. देशमुखांच्या विरोधात सर्व पुरावे ईडीला मिळाले आहेत. देशमुखांना अटक होईल,” असे ऍड जयश्री पाटील यांनी सांगितले. ऍड जयश्री पाटील यांनी देशमुख यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चैाकशीसाठी देशमुखांना ईडीने समन्स बजावले असून आज देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे. अँड. पाटील यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
ऍड. जयश्री पाटील म्हणाल्या, ”ईडीने माझ्या तक्रारीवर अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केलेली आहे. मी दिलेली सगळी माहिती आहे. मी दिलेल्या पीडित लोकांची माहिती आहे जे अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराने पिळले जात होते. त्यामुळे अनिल देशमुख यांना अटक केली पाहिजे, अशी माझी मागणी होती. कारण अटक केली नाही तर ते पुरावे नष्ट करु शकतात. ईडीच्या कारवाईवर मी समाधानी आहे. सीबीआयने जो गुन्हा दाखल केला आहे तो माझ्या तक्रारीवर उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्यानुसार दाखल केला आहे.”
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स पाठवून पुन्हा आज मंगळवारी (ता. २९ जून) चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे देशमुख आज ईडी कार्यालयात उपस्थित राहतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी शनिवारी (ता. २६ जून) देशमुख यांना चौकशीसाठी ईडीने हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, चौकशीचे मुद्दे कळल्यानंतरच उत्तरे देता येतील, अशी भूमिका घेत देशमुखांनी एकप्रकारे ईडीवर कुरघोडी केली होती. देशमुख यांच्या वकिलाने शनिवारी (ता. २६ जून) अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली होती. त्यानंतर आज (ता. २८ जून) पुन्हा ईडीने समन्स पाठवून मंगळवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
मनी लाँडरिंगप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार करणारे ॲड. तरुण परमार यांचा जबाब सोमवारी (ता. २८ जून) ईडीने नोंदवला. या वेळी त्यांनी काही कागदपत्रेही ईडी कार्यालयात सादर केली. या प्रकरणी ईडीने पुन्हा बोलवल्यास आपण उपस्थित राहून यंत्रणेला सहकार्य करू, असे परमार यांनी सांगितले आहे.