शिंदे गटाला धक्का! शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यास परवानगी
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्याची मागणी शिवसेनेनं महापालिकेकडे केली होती. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचं कारण महापालिकेकडून देण्यात आलं. महापालिकेच्या भूमिकेनंतर शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने निकाल दिला. शिंदे गटाला झटका बसला असून शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर केवळ महाविकासआघाडी सरकारच कोसळलं नाही, तर अगदी शिवसेना कोणाची हाही प्रश्न उपस्थित झाला. यावर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर सुनावणी सुरू असतानाच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्नभूमीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सुरू केलेला ऐतिहासिक दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. तसेच मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचंही महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं.
दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. तसेच शिवसेना कुणाची याबाबत नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी पालिकेचा निर्णय नाकारण्याचा निर्णय वास्तविकतेला धरून नाही, असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं. दादर पोलिसांचं संख्याबळ पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचंही न्यायालयाने नमूद केलं.
दोन्ही अर्जांची कल्पना मुंबई महापालिकेला होती. मुंबई महापालिकेकडे शिवसेनेनं अर्ज दाखल केल्यानंतर पोलिसांचा अहवाल महापालिकेला मिळाला. मात्र, शिवसेनेनं कायदा व सुव्यवस्था राखण्याची हमी दिली. मात्र, महापालिकेनं अधिकारांचा गैरवापर केला, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली.
विशेष म्हणजे मेळाव्यादरम्यान काही गोंधळ झाल्यास या मुद्द्यावर भविष्यात परवानगी न देण्याबाबत उच्च न्यायालयाने सूचक इशाराही दिला आहे. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांना मेळाव्याचे चित्रीकरण करण्याचीही मुभा देण्यात आली.