मटक्याचा हायटेक ऑनलाइन जुगार; ‘ बासमती ‘तांदळावर लिलावाच्या आडून मटक्याची बोली.
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (प्रतिनिधी)। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मध्यमवर्गीय आणि विशेषतः कामगार वर्गाला कंगाल करणारा चिठ्ठीतील ‘मटका’ हळुहळू ऑनलाइन होऊ लागला आहे. पांढऱ्या,लाल, पिवळ्या चिठ्ठीची जागा आता कम्प्युटराइज्ड पावतीने घेतली असून, बासमती तांदळाच्या (राइस) लिलावाच्या बहाण्याने हा ‘ऑनलाइन मटका’ चालविला जात आहे. मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी गेल्या महिनाभरात केलेल्या कारवायांमधून मटक्याचा हा नवीन हायटेक अवतार समोर आला आहे.
एखाद्या टपरीवर किंवा लॉटरी सेंटरमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून मटक्याचे आकडे लावले जातात. एसडीएस ब्रॅण्डिंग अँड ट्रेडिंग राइस ऑक्शनिंग सेंटर या कंपनीच्या वतीने हा जुगार चालवला जात आहे. लॉटरीचालकांची ठिकठिकाणी धरपकड सुरू असताना नवी मुंबई पोलिसांनी या कंपनीच्या मालकाला अटक केली. पारंपरिक मटक्याच्या पत्त्यामधील एक्का ते दस्सा पर्यंतच्या आकड्यांवर पैसे लावले जातात. ओपन आणि क्लोज अशा दोन वेळा आकडे जाहीर केले जातात. एक रुपयाला नऊ रुपये अशाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारात परतावा मिळण्याचे प्रमाण वाढते. संगम, जोडी, सुट्टा, सिंगल पाना, जॅकपॉट असे विविध प्रकार आहेत. याच जुगाराला आधुनिक जोड देऊन कायद्यापासून पळ काढण्यासाठी त्याला तांदळाचा लिलाव असे स्वरूप देण्यात आले आहे.
गोल्ड बासमती, सिल्वर बासमती, प्लॅटिना बासमती, डायमंड बासमती या तांदळाच्या वेगवेगळ्या प्रकारांवर बोली घेतली जाते. कम्प्युटरवर दहा घरे दिसतात. जितके घर पुढे जाल, तितका अधिक पटीने परतावा मिळतो. अप आणि डाऊन अशा दोन प्रकारांत रक्कम स्वीकारली जाते. जुन्या पद्धतीने दोन वेळा आकडे जाहीर केले जातात; मात्र आधुनिक मटक्याचे आकडे प्रत्येकी १५ मिनिटांनी जाहीर होतात.