भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

‘अनिल देशमुखांकडून वाझेंना दरमहा १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट’; परबीर सिंग यांचा गंभीर आरोप

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई वृत्तसंस्था: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अत्यंत खळबळजनक खुलासा करत सचिन वाझे प्रकरणात एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या दाव्यानुसार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्यापोटी १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असा खळबळजनक खुलाला परमबीर सिंह यांनी केल्याचा दावा टाईम्स नाऊ या इंग्रजी संकेतस्थळाने केला आहे. परमबीर सिंह यांच्या मुंबई पोलिस आयुक्त पदावरून गच्छंतीनंतर ब्लेम गेम सुरू होतानाच त्यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा केला आहे. याआधीच अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्या कार्यपद्धतीकडे बोट उचलत त्यांची चूक असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले होते. अनिल देशमुख यांना एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात परमबीर सिंह यांची बदली का केली असा सवाल करण्यात आला होता. त्यामुळे परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर पलटवार करत एकच खळबळ उडवून दिली आहे. टाईम्स नाऊ या संकेतस्थळाने एका ट्विटच्या माध्यमातून परमबीर सिंह यांचा खळबळजनक दावा प्रसिद्ध केला आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी गृहमंत्र्यांवर हे आरोप केले आहेत. सचिन वाझेंना बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे वसुल करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनीच दिले होते असाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. (home minister Anil deshmukh ask sachin vaze to collect 100 cr rupees per month from bars and restaurants alleges ex mumbai cp parambir singh)

प्रत्येक महिन्यापोटी १०० कोटी रूपये गोळा करण्याचे आदेश खुद्द गृहमंत्र्यांनीच दिले होते या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंना प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) ने अटक केली आहे. सचिन वाझेंनी वापरलेल्या गाड्या, मुंबई पोलिस दलात पदाचा केलेला दुरूपयोग आणि पोलिस दलाची मलिन केलेली प्रतिमा यासारख्या गोष्टीमुळे परमबीर सिंह यांना जबाबदार ठरवत अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिस आयुक्तपदी असलेल्या परमबीर सिंह यांची गच्छंती केली. त्यांच्या जागेवर मुंबई पोलिसांचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांची नेमणुक करण्यात आली आहे. पण परमबीर सिंह यांच्या दाव्यामुळे पोलिस दलासह राज्याच्या राजकारणातही मोठा भूकंप झाला आहे. याचा फटका हा महाविकास आघाडी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही बसेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

या संपुर्ण प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे. राज्याच्या राजभवनालाही हे पत्र परमबीर सिंह यांनी पाठवले आहे. राजभवनातूनही परमबीर सिंह यांचे पत्र मिळाल्याचा दुजोरा देण्यात आला आहे. एकुणच या प्रकरणावर राज्याच्या विरोधी पक्षाकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!