आगामी तीन दिवसात हिमालयात पावसासह हिमवृष्टीची शक्यता,उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रात हवामान कस राहील
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला आहे. सोमवारी जळगावातील तापमान 7.5 अंशावर गेले होते. त्यामुळे जळगावात कडाक्याची थंडी पडली आहे.
अशातच आता आगामी तीन दिवस पश्चिम हिमालय प्रदेशात अनेक ठिकाणी मध्यम पावसासह हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानूसार, आगामी काळात महाराष्ट्रातही तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात किंचितशी वाढ झाली असल्याची माहिती आहे. अनेक भागात दोन ते तीन अंश सेल्सिअसपर्यंतची वाढ नोंदण्यात आली. उद्या (गुरूवारी) राज्यात तापमानाची हिच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. परंतु, त्यानंतर राज्यात तापमानाचा पारा 2 ते 4 अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, आगामी काही दिवसात थंडी वाढणार आहे.
दरम्यान, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक आणि आसपासच्या जिल्ह्यांत थंडी सर्वाधिक जाणवणार आहे. त्याचबरोबर आज (बुधवारी) सकाळी पुणे जिल्ह्यात शिरूर याठिकाणी सर्वात कमी किमान (पारा 9.4 अंशावर) तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे याठिकाणी देखील गारठा वाढला आहे. दरम्यान, आज-उद्या हिमाचल प्रदेशात, 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच येत्या 24 तासांत पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडीसा या राज्यात धुके पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.