शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस; विधेयका विरोधात आज दिवसभर अन्नत्याग करणार !
मुंबई (वृत्तसंस्था): राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये शरद पवार यांच्याकडून निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचे समजते.
याबाबत शरद पवार यांनी आजच्या पत्रकारपरिषदेत भाष्यही केले. त्यांनी म्हटले की, सुप्रियालाही काल संध्याकाळी नोटीस येणार होती. मात्र, पहिली नोटीस मलाच आली, हे चांगले झाले. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून आयकर विभागाने ही नोटीस पाठवल्याचे मला समजले. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे, याचा मला आनंद असल्याची खोचक टिप्पणी यावेळी पवार यांनी केली. तसेच आपण या नोटिसला लवकरात लवकर उत्तर देऊ, असेही पवारांनी स्पष्ट केले. कारण वेळेत उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असा उल्लेखही संबंधित नोटीसमध्ये असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
राज्यसभेत कृषीविधेयक मंजूर करताना राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांनी केलेल्या वर्तनावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार प्रचंड संतापले आहेत. राज्यसभेच्या उपाध्यक्षांचं वर्तन सदनाचं अवमूल्यन करणारं असून त्याविरोधात मी आज एक दिवसासाठी अन्नत्याग करणार आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.