शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी,सोशल डिस्टन्सिंग,मास्क बंधनकारक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। आरोग्य विभागाच्या आरोग्यसेवा संचालनालयाकडून शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या शासन निर्णय व त्यातील मार्गदर्शक सूचनांची आता प्रतीक्षा आहे. येत्या १ डिसेंबरपासून राज्यभरातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जिल्हा परिषद, महापालिका स्तरावर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, विद्यार्थ्यांमधील सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
या मार्गदर्शक सूचना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन राज्यातील सर्व शाळांनी करायचे आहे. आरोग्य विभागाने केलेल्या या सूचनांचा विचार शिक्षण विभाग करणार आहे. त्यानंतर याबाबतीत शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे.
मार्गदर्शक सूचना
-दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतो किमान सहा फूट अंतर ठेवावे.
-शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकांनी मास्क घालणे बंधनकारक आहे.
-वारंवार हात धुवावे, शाळेत स्वच्छता ठेवावी.
-शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
-शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितीच्या पद्धतीचा अवलंब करू नये.
-शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात.
-ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती असावी.
-मुले किंवा शिक्षक आजारी असेल तर त्यांनी शाळेत येऊ नये,आवश्यक नियमांचे पालन करावे.
-क्वॉरंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी