यंदा ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई ,वृत्तसंस्था। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात पाऊस सक्रीय राहणार आहे. त्यानंतरच मॉन्सूनच्या माघारीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मुंबई आणि पुण्यातून मान्सूनच्या माघारीची तारीख ८ ते ९ ऑक्टोबरच्या आसपास असते. यंदाही याच काळात मॉन्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे. अशी माहिती हवामान खात्याने वर्तवली आहे.
दक्षिण मध्य मध्य महाराष्ट्रात ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत साधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या काळात बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात वायव्य आणि मध्य भारतातही पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत देशभरात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ ऑक्टोबरपूर्वी उत्तर -पश्चिम हिंदुस्थानातून मान्सूनला माघार घेण्यास अनुकूल परिस्थिती नाही. त्यामुळे राज्यातूनही ५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सक्रीय राहणार असून त्यानंतरच मॉन्सूनच्या माघारीला सुरुवात होणार आहे.