नात्याला काळिमा; आजोबाकडून नात आणि मुलीवर वारंवार बलात्कार, जन्मठेपेची शिक्षा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई: वृत्तसंस्था। मुंबईच्या विशेष न्यायालयानं बलात्कार प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आपल्याच मुलीवर आणि अल्पवयीन नातीवर बलात्कार करणाऱ्या 65 वर्षीय व्यक्तीला पॉक्सोंतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडित महिलेनं न्यायालयात म्हटलं, की जेव्हा ती 15 वर्षाची होती तेव्हापासून तिचे वडील तिच्यावर बलात्कार करत होते.
महिलेनं सांगितलं, की लग्नानंतर ती आपल्या आई – वडिलांसोबतच राहात होती. महिलेनं पुढं सांगितलं, की तिच्या वडिलांनी तिला धमकी दिली होती, की याबद्दल तिनं कोणाला काही सांगितल्यास तो तिच्या मुलांना याची शिक्षा देईल. महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, ती आपल्या आईसोबत घरकाम करायची, तर तिचे वडील, भाऊ आणि नवरा चित्रकार होते. महिलेनं असंदेखील सांगितलं, की याबाबत तिनं आपल्या शेजारीला सांगितलं होतं, मात्र यानंतर तिचा मृत्यू झाला. यामुळे महिलेनं पुन्हा याबाबत कोणालाही काहीच सांगितलं नाही.
इतकंच नाही तर महिलेनं असंही सांगितलं, की 2017 मध्ये तिच्या दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुलीनं तिला सांगितलं, की आजोबा रात्री माझ्यासोबत झोपतात आणि चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करतात. मुलीनं केलेल्या तक्रारीनंतर महिलेनं लगेचच पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. सर्व पुरावे आणि माहितीनंतर न्यायाधीश रेखा एन पंधारे यांनी आयपीसी कलम 376 (2) आणि पॉक्सोंतर्गत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली सोबतच दंडही ठोठावला. आरोपीला आपल्या मुलीला 50,000 रुपये आणि नातीला 25,000 देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.