स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढविण्याची भूमिका नाही – नवाब मलिक
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाविकास आघाडीचे सरकार असले सत्तेवर तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही, असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. निवडणुकीत आघाडी करायची किंवा कसे याबाबत स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार असल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले.
स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणूका होणार आहेत. आघाडी विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होईल अशी परिस्थिती नाही, असेही मलिक म्हणाले. काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे अस्तित्व नाही. त्यामुळे कॉंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी – शिवसेना लढत होईल. ज्याठिकाणी दोन पक्षाची, तीन पक्षाची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल तेथे परिस्थिती बघून निर्णय होणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.