कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट,या भ्रमात राहू नका..! १ जूनपासून निर्बंध हटणार नाहीत, पण…; आरोग्य मंत्र्यांचे संकेत
Monday To Monday NewsNetwork।
।
मुंबई(वृत्तसंस्था)।गेल्या १५ एप्रिलपासून महाराष्ट्रात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यात राज्यात दिवसाला सरासरी ५० हजारांच्यावर कोरोना रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले होते.गेल्या महिनाभरापासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. सध्या राज्यात २४ तासांत २२ हजारांपर्यंत रुग्णांची संख्या आलेली आहे. रविवारी राज्यात २६ हजार ६७२ कोरोना रुग्ण आढळले तर ५९४ मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. राज्यात एकूण कोरोना रुग्णसंख्या ५५ लाख ७९ हजार ८९७ इतकी झाली आहे. त्यातील जवळपास ५१ लाख ४० हजारांहून अधिक रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. सध्या ३ लाख ४८ हजार ३९५ सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
राज्यात १ जूनपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अलीकडेच रुग्णसंख्येत होणारी घट पाहता राज्य सरकारकडून निर्बंध उठवले जातील अशी सर्वसामान्यांची आशा आहे. परंतु ठाकरे सरकार यावर गांभीर्याने विचार करत आहे.राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सगळ्या गोष्टींचा बारकाईना विचार केला जाणार आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संकेत दिलेत की, सध्या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन तयारी सुरू आहे. सगळं काही सकारात्मक राहिल्यास लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल. टास्कफोर्सच्या सल्लागारांशी चर्चा करून कडक निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा निर्णय होऊ शकतो. परंतु निर्बंध पूर्णपणे काढून टाकण्यात येतील या भ्रमात राहू नका असा इशाराही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत
राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उचलण्याचं नियोजन सुरू आहे. ३० जूनपर्यंत हे प्लॅनिंग पूर्ण होईल. परंतु सर्व सुरळीत होण्यासाठी किती काळ जाईल याबाबत आत्ताच काही सांगता येत नाही. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आहे. त्यामुळे निर्बंध काढले जाणार नाही मात्र त्यात काही प्रमाणात सूट देता येईल का यावर निर्णय होईल असं टोपे म्हणाले.
असे चार टप्पे कसे असतील? पहिल्या टप्प्यात दुकानं सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. दुसऱ्या टप्प्यात काही आवश्यक वस्तूंची दुकानं खुली करण्याला परवानगी दिली जाईल. परंतु ही दुकानं एक दिवसाआड उघडली जातील.तिसऱ्या टप्प्यात राज्यातील हॉटेल्स, परमिट रुम्स, बिअर बार यांना काही नियम अटी घालून सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. हॉटेल्स पूर्ण क्षमतेने उघडता येणार नाहीत. ५० टक्के उपस्थिती आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं बंधनकारक राहील.