राज्यात एक जून नंतर निर्बंध शिथिल होणार? मात्र …राजेश टोपेंचं महत्वाचं विधान
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई (वृत्तसंस्था)। कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं मुंबईसह राज्यात हाहा:कार माजवला आहे. देशातील 19 राज्यात कडक लॉकडाउन आहे. तर 13 राज्यात आंशिक लॉकडाउन लावण्यात आलेला आहे.राज्यतील ठाकरे सरकारनं देशात सर्वात आधी लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला होता. जवळपास महिनाभरापासून राज्यात लॉकडाउन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाउनचा दिलासादायक परिणामही दिसून आला. 70 हजारांवर गेलेली रुग्णसंख्या सध्या 30 हजारांच्या खाली आहे. आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाच्या प्रयत्नांच्या बळावर राज्याती कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला लागला आहे. पण, असं असलं तरी अद्यापही कोरोनाचं संकट मात्र टळलेलं नाही. त्यामुळे प्रशासनाकडून अतिशय सावधगिरीनं पावलं उचलली जात आहेत. राज्यातील लॉकडाउन 1 जून 2021 रोजी संपणार आहे. त्यानंतर पुढे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांसह सर्वांनाच पडला आहे. राज्य सरकारनेही पुढील तयारी करण्यास सुरु केली आहे. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात राज्यात लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यात 15 मे रोजी पुन्हा 15 दिवसांनी वाढ करण्यात आली. महिन्याभरापासून सुरु असणारे लॉकडाउनचे नियम शिथिल होणार की लॉकडाउन आणखी वाढवला जाणार ? याबाबतचेच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केले आहेत. लोकांच्या मनातील या प्रश्नांचं उत्तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील निर्बंध शिथील होण्याचे संकेत आरोग्य मंत्र्यानी दिले आहेत.
कोरोना रुग्णसंख्या कमी असणाऱ्या आणि मृतांचा आकडा कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये एक जूननंतर लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचे, स्पष्ट संकेत राजेश टोपे यांनी शनिवारी दिले आहेत. रुग्णसंख्या कमी होणाऱ्या शहरात निर्बंध शिथिल करण्यात येणार असले तरीही ते एकाच वेळी शिथिल होणार नाहीत. टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले.
पहिल्या लाटेनंतरही आपण टप्प्याटप्यानं निर्बंध शिथील केले होते. मात्र, नागरिकांनी काळजी न घेतल्यामुळे कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरीही धोका कायम आहे. त्यामुळे मास्क वापरा आणि सोशल डिस्टन्सिंग वापरा. जेथील रुग्णसंख्या आटोक्यात आली त्या शहरातील लॉकडाउन शिथील करण्यात येऊ शकते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच यासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचंही टोपे यांनी स्पष्ट केलं.