राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंचे स्पष्ट संकेत
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई( वृत्तसंस्था)। देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या काही अंशी घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी आहे. राज्यातील ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत. आदित्य ठाकरे यांनी सीएनबीसी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान राज्यातील लॉकडाऊनसंदर्भात भूमिका स्पष्ट केली. लॉकडाऊन असला तरी, राज्यात महत्वाची कार्यालये, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरू आहे. पण तुम्ही अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर कधी पडणार, असे विचारत असाल तर ते पूर्पणे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.
कोरोना रुग्णांच्या संख्येवर हे सर्व अवलंबून। राज्यातील कोरोना रुग्णसंख्येवर हे सर्व अवलंबून आहे. राज्यात चाचण्यांची संख्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रत्येकाने चाचणी करावी, यासाठीही पुढाकार घेत असून, कोरोना रुग्णसंख्या किती आहे, यावरच लॉकडाऊन उठवला जावा की वाढवला जावा, ही बाब अवलंबून असणार आहे. आरोग्य आणि सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
अधिकाधिक लसीकरणावर भर राज्य सरकारकडून अधिकाधिक लसीकरणावर भर दिला जात आहे. महाराष्ट्रात सर्वांत जलदगतीने लसीकरण होत आहे. आम्ही आतापर्यंत दोन कोटी नागरिकांचे लसीकरण केले आहे. जागतिक स्तरावरही प्रयत्न सुरू आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकणाऱ्या तिसऱ्या लाटेला रोखायचं असेल तर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करुन त्यांना सुरक्षित करावे लागेल. ग्रामीण भागात जास्त लोकसंख्या असणाऱ्या ठिकाणी लसीसकरण करण्याचे आव्हान राज्य सरकारसमोर आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.