मनसुख हिरेन हत्येचा उलगडा, ATS चा मोठा दावा, दोन जण अटकेत !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ने पहिली अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची विनायक शिंदे आणि नरेश दारे अशी नावे आहेत. मनसुख हिरेन प्रकरणात या दोघांचाही सहभाग आढळून आला आहे. तर याच प्रकरणाशी संबंधित दोन पोलिस अधिकाऱ्यांचीही चौकशी होत आहे. या प्रकरणात काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. मनसुख हिरेन प्रकरणात आणखी काही नव्या बाबी उघडकीस येतील अशीही माहिती आहे. शनिवारपासूनच ठाण्यात एटीएसकडून तपासाला वेग आला होता. त्यानंतर हे प्रकरण केंद्राची यंत्रणा असलेल्या नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सीकडे गेल्याची माहिती समोर आली. आज रविवारी झालेली अटक ही दहशतवाद विरोधी पथकाकडून झाली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा आता एटीएसकडून करण्यात येत आहे.
मनसुख यांचा मृतदेह ज्या दिवशी मुंब्रा रेतीबंदर परिसरात आढळला होता, त्यावेळी हे दोन जण त्या ठिकाणी होते, असे एटीएसच्या सूत्रांकडून कळते आहे. या दोघांचा हत्या प्रकरणात नेमका काय रोल होता का हे एटीएस तपासून पहात आहे. मनसुख हिरेन यांची हत्या निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze)यांनीच केल्याचा आरोप हिरेन यांच्या पत्नीने केला होता. विधानसभेत विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात राळ उठवली होती. त्यानंतर काही दिवसांतच सचिन वाझेंना एनआयए (NIA)अटक केली.
प्रसिद्ध उद्योगपती व रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्या मुंबईतील अँटिलिया बंगल्याजवळ २५ फेब्रुवारीला संशयित गाडी आढळून आली होती. त्या गाडीत जिलेटीनच्या २५ कांड्याही सापडल्या होत्या. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवलेली गाडी आढळली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या गाडीच्या मालकाचा पोलिसांनी शोध घेतला होता. त्यावेळी ती गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात असल्याचे समोर आले होती. ती गाडी काही दिवसांपूर्वी चोरीला गेल्याचेही समोर आले होते. हिरेन हे तीन मार्चपासून बेपत्ता होते. ठाणे पोलिसांना ५ मार्चला हिरेन यांचा मृतदेह रेतीबंदर येथे खाडीत सापडला.
दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) देण्याचा आदेश गृहमंत्र्यालयाने दिला आहे. ‘एटीएस’कडून हा तपास काढून घेण्यात आला आहे. ‘एटीएस’ने या प्रकरणात शोधलेले पुरावे ‘एनआयए’ ‘एटीएस’कडून घेणार आहे. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास ‘एटीएस’चे मुख्य अतिरिक्त महासंचालक जय जीत सिंह आणि उपमहानिरीक्षक शिवदीप पांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत होता.