मोठी बातमी; जीन्स, टी-शर्ट घालण्यास सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना बंदी !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई : राज्यातील सर्व सरकारी कार्यालयात काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेहरावाकडे लक्ष देण्यास सरकारने सुरवात केली आहे. याचाच भाग म्हणून कर्मचाऱ्यांना जीन्स, टी-शर्ट आणि स्लीपर घालण्यास बंदी करण्यात आली आहे. कार्यालयात येताना या गोष्टी त्यांना टाळाव्यात, असा आदेशच सरकारने दिला आहे. दरम्यान, या निर्णयाचे मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटनेने स्वागत केले आहे.
राज्य सरकारने याबाबत परिपत्रक काढले आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याचे निर्देश सरकारने दिले आहेत. कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे आधिकारी, कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांना अनुरुप पेहराव करीत नाहीत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिमा मलिन होते. दरम्यान, कंत्राटी भरतीवरील कर्मचारी असल्यामुळे सरकारला असा निर्णय घ्यावा लागला असल्याचे मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार, गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम आणि चित्रे असलेले कपडे घालू नयेत. तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स आणि टी-शर्टचा वापर कार्यालयात टाळावा. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच शक्यतो चपला, सॅन्डल, शूजचा वापर करावा. पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शूज आणि सॅन्डलचा वापर करावा. कार्यालयामध्ये स्लिपरचा वापर करू नये. याचबरोबर परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता घ्यावी.
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिधान केलेला पेहराव व्यवस्थित असावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा. महिला कर्मचाऱ्यांनी साडी, सलवार/चुडीदार कुर्ता, ट्राऊजर पँट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपड्यांचा वापर करावा.