ममता बॅनर्जींचा काँग्रेसशिवाय तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न,
ममता आणि शरद पवारांमध्ये राजकीय खलबतं!
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई ,वृत्तसंस्था। देशपातळीवरील राजकारणात मोठी खळबळ माजवणारी घटना आज महाराष्ट्रात घडली. तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचा अजेंडा स्पष्ट होता. मोदींविरोधात पर्यायी आघाडी तयार करण्याचा. शरद पवारांसोबत एक तास चर्चा झाल्यानंतर ममता दीदींनी पत्रकार परिषदेत ते स्पष्ट केलं. ममता बॅनर्जींचा काँग्रेसशिवाय तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न आहे, त्याची झलक त्यांच्या बोलण्यातूनही आज दिसली.
परकार परिषदेत शरद पवार यांनी यूपीएचं नेतृत्व करावं असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आला. त्यावर कुठे आहे यूपीए? आता यूपीए नाहीये. यूपीए काय आहे? असा प्रती सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यावेळी ममता बॅनर्जी यांना मध्ये तोडत, शरद पवार म्हणाले की, इथे नेतृत्वाचा विषय नाही. एक स्ट्राँग अल्टरनेटिव्ह, ज्यांच्यावर या देशातील जनतेचा विश्वास असेल. भाजपला दूर करण्यासाठी मदतगार होईल, त्या रस्त्याने आम्ही जाऊ, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
ममता बॅनर्जींचा राहुल गांधींवर निशाणा
ममता बॅनर्जी 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्यात. मुंबईत येताच त्यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांशी चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पवारांच्या निवासस्थानी आल्या. पण काँग्रेसच्या नेत्यांशी भेटणं त्यांनी टाळलं. उलट मुंबईतून त्यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे टीका केलीय. एखादा व्यक्ती काहीच करत नसेल आणि तो फक्त परदेशातच राहत असेल तर राजकारण कसं करता येईल? अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे. तुम्ही फिल्डवर राहिला नाही तर काँग्रेस तुम्हाला बोल्ड करेल. तुम्ही फिल्डवर राहिला तर भाजपचा पराभव होईल, असं ममता दीदी म्हणाल्या.
महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालला नेण्याचा डाव आहे का?
दुसरीकडे भाजपनं मात्र ममता बॅनर्जींच्या मुंबईतल्या दौऱ्यावरुन आणि आदित्य ठाकरेंसोबतच्या बैठकीवरुन आक्षेप घेतलाय. महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालला नेण्याचा डाव आहे का? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलाय. शरद पवांच्या उपस्थित ममता बॅनर्जी म्हणाल्या की यूपीए संपली, याचा काँग्रेसनं विचार करायला हवा का? असा सवालही आशिष शेलार यांना करण्यात आला. त्यावेळी काँग्रेसला बुद्धी असेल तर त्यांनी विचार करावा. याचं कारण काँग्रेसला स्वत:च्या अस्तित्वाबद्दलच उभं राहिलं पाहिजे याबद्दलचा प्रश्न मनात पडत असेल तर ते जनतेसमोर काय मांडणार? अशी खोचक टीका शेलार यांनी काँग्रेसवर केलीय.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांचं टार्गेट फिक्स आहे, ते 2024 ची लोकसभा निवडणूक. त्यासाठीच त्यांनी भेटीसाठी सुरु करुन फिल्डिंग लावणं सुरु केलंय. आता मोदींविरोधातल्या त्या आघाडीत काँग्रेस असेल की नाही?, ही येणारी राजकीय परिस्थितीच ठरवेल.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा