मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय ;प्रजासत्ताक दिन सोहळ्याची नवीन तारीख जाहीर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्था एएनआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासूनच सुरू होणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सुभाषचंद्र बोस यांची जयंती समाविष्ट करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारचा हा निर्णय भारताच्या इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित मोठ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ घेण्यात आला आहे.
भाजप सरकारने यापूर्वीच अनेक तारखांना महत्त्वाचे दिवस म्हणून घोषित केलं आहे. यामध्ये 14 ऑगस्ट हा फाळणी स्मृती दिन, 31 ऑक्टोबर सरदार पटेल यांचा जयंती राष्ट्रीय एकता दिवस, 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित देशभरातील स्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना आखल्या आहेत. गेल्या वर्षी, ऑक्टोबरमध्ये, वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिलं होतं की, 21 ऑक्टोबर 1943 रोजी बोस यांनी जाहीर केलेल्या आझाद हिंद सरकारच्या स्थापनेच्या वर्षपूर्तीच्या स्मरणार्थ पर्यटन मंत्रालय क्युरेटेड टूरचे आयोजन करत आहे. “सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृती स्थळांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या रस्त्यांचा समावेश असेल. यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी जोडलेल्या स्मृती स्थळांचा समावेश असणार आहे. नेताजींशी संबंधित स्मृती स्थळांची जगाला ओळख करून देण्यासाठी टूर ऑपरेटर्सना करण्यात येईल,” असं एका अधिकाऱ्याने सांगितल्याचं पीटीआयने म्हटलं होतं.