पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या बारव ला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करा,एकनाथराव खडसे यांची मागणी
मुंबई/मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। ‘प्रजा हेच दैवत’ आणि प्रजेचे काम करणे हेच आपले आद्यकर्तव्य आहे या उक्तीवर निष्ठा ठेवून कार्य करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी ज्या काळी दळणवळणाची साधने फारच कमी होती किवा म्ह्टले तर नव्हती अश्या खडतर काळात भारतातील तिर्थक्षेत्रांच्या व इतर ठिकाणी वाटसरूंना सोय व्हावी म्हणून मंदिरे धर्मशाळा तलाव, विहिरी, पाणपोई, घाट अशी अनेक समाज उपयोगी कामे केली. आज ही वास्तुशिल्पे व त्यांनी उभारलेली स्थापत्य कला राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या भव्य कार्याची साक्ष देत उभी आहेत. वास्तुशिल्प व बांधकाम केल्यामुळे कारागिरांची कला जोपासून संकृतीचा वारसा तर जपलाच पण त्याच बरोबर गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळवून दिले.
मुंबई नाशिक महामार्गावर व मुंबईहून नाशिक कडे येताना वाटेत कसारा घाटात वाटसरूंना पाणी पिण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी एक बारव(विहीर) बांधली आहे
मागील आठवड्यात मुंबई वरून येतात रोहिणी खडसे यांनी या बारव ला भेट देऊन त्या बारव बद्दल ऐतिहासिक महत्व सांगणारा व्हिडीओ आपल्या फेसबुक वर अपलोड केला होता तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता या बारवचे संरक्षण होऊन पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचा रोहिणी खडसे यांनी मनोदय व्यक्त केला होता ही बाब शासन दरबारी मांडावी यासाठी त्यांनी आ एकनाथराव खडसे यांच्या कडे पाठपुरावा केला होता.
आज विधानपरिषद सभागृहात पर्यटन विभागाच्या विषयावर चर्चा सुरू असताना आ.एकनाथराव खडसे यांनी कसारा घाटातील या बारव ला शासनाने संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करून बारव चा विकास करावा अशी मागणी केली
यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी रस्त्याच्या वाटसरूंना पाणी पिण्यासाठी बांधलेली ऐतिहासिक बारव (विहीर)आहे
जवळपास २५० वर्षांपूर्वी राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी ही बारव बांधली आहे. उन्हाळ्यात उंचावर असलेल्या बारवमध्ये भरपूर पाणी आहे. ४० फूट व्यासाची बारव पूर्ण दगडाने सुबक पद्धतीने बांधली आहे.यावर वरच्या बाजूने दगडाच्या बांधकामात गोल घुमट बांधला आहे
झाड-पाला, जंगली प्राणी पडून पाणी दूषित होऊ नये, तसेच उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, म्हणून त्यावर तीन बाजूंनी तीन अर्धगोलाकार आकाराच्या खिडक्या सोडत गोल घुमट आकाराच्या खिडक्या सोडत गोल घुमट बनविले आहेत. दगडी शिळा एकमेकांवर ठेवत राजवाडे किंवा महालाच्या घुमटासमान हे छत बनवताना बारवच्या सौंदर्यात अजूनच भर टाकत तिची स्वच्छताही ठेवण्याचे काम केलेले दिसते. बारवेत वर्षभर पिण्यायोग्य पाणी टिकून असते. घाटातील दोन वाड्यांतील महिला आजही वर्षभर याच बारवमधील पाणी वापरतात. बारव किती खोल आहे, याचा अंदाज त्यात असलेल्या पाण्यामुळे येत नाही. मात्र, आजही बारव स्वच्छ व सुंदर असून, तिच्यात थोडीही पडझड झालेली नाही. बारव चे बांधकाम लोकमाता राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केल्यामुळे ‘राणी अहिल्यादेवींची बारव’ या नावाने ओळखतात.
महाराष्ट्र शासनाने या बारवकडे लक्ष देण्याची गरज आहे
या बारव ला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावे तसेच
या पुरातन वास्तू चा जीर्णोद्धार करावा बारव जवळ मोकळी जागा असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने त्या जागेचा विकास करावा जेणेकरून घाटातून जाणारे प्रवासी तेथे थांबतील
त्यातुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल व पुरातन वास्तूचे जतन केल्याने पुढच्या पिढीला इतिहास ज्ञात होईल
अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी केली याला ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी उत्तर दिले यावेळी ते म्हणाले आ एकनाथराव खडसे यांनी सुचवलेल्या कसारा घाटातील बारव आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या इतर बारवांची माहिती घेतली जाईल आणि त्यांचे जतन करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे गिरीश महाजन यांनी सांगितले