दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच; नारायण राणेंची जोरदार फटकेबाजी
मुंबई, प्रतिनिधी : शिवसेनेने दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविला आहे. त्यानंतर शिवसेनेने थेट भाजपलाच थेट आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. त्यावरून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच आहे, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी चढवला आहे.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. बऱ्याच दिवसाने मी तुमच्यासमोर आलो आहे. काहींचे फटाके ऐकत होतो. संजय राऊतांचे अग्रलेख दोन दिवसांपासून वाचत होतो. देशात पोटनिवडणुका झाल्या. एक जागा अपक्ष उमेदवार जिंकला. शिवसेनेने मात्र डंका सुरू केला आम्ही जिंकलो. महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही जिंकलो असा डंका पिटत आहेत सर्वत्र. मी मुद्दामहून त्या विजयी उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. बॅट घेऊन उभा असलेला फलंदाज ही त्या उमेदवाराची निशाणी आहे. दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहेच, असा सणसणीत टोला राणेंनी लगावला.
भाजपवर टीकेचा भडीमार सुरू आहे. आता 56 आमदार आहात. ते मोदींमुळेच निवडून आला आहात. नाही तर 8च्यावर गेला नसता. राजकीय निरीक्षकही त्यावेळी हाच आकडा सांगत होते. मोदींची मेहरबानी म्हणून 56चा आकडा आला. युती केली आणि नंतर गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, असं सांगतानाच मुख्यमंत्री काय बोलतात ते कळत नाही. पत्रकारांना कसं कळतं? मुख्यमंत्र्यांची चौफेर फटकेबाजी म्हणून सांगता. पण फटकेबाजी नेमकी काय? मीडियाने आतापर्यंत सांभाळलं, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी राणेंनी शरद पवार आणि काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेने दिलेल्या हेडिंगच वाचून दाखवल्या. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे अधू मेंदूचे लोक आहेत. प्रत्येक ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प तुमच्या दिवट्याने कसे अर्धवट टाकले हे पाहा, अशा हेडिंग सामनाने दिल्या होत्या. आज मात्र ते पवार आणि काँग्रेसचे गुणगाण गात आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.
असं त्यांनी लिहिलं होतं.