धक्कादायक; नौदल अधिकार्याचे १० लाखांसाठी अपहरण करून जिवंत जाळले
मंडे टू मंडे वृत्तसंकलन। मुंबई :
एका नौदल अधिकार्याला चेन्नई विमानतळावरून अपहरण करून कारने पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात नेऊन जिवंत जाळण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली.
भारतीय नौदलात सिबिंग सीमॅनपदी रुजू झालेले सुरजकुमार मिथिलेश दुबे (वय २७) हे झारखंडच्या रांचीतील असल्याचे सांगण्यात आले. दुबे ३१ जानेवारीला चेन्नई विमानतळावर पोहचल्या नंतर तेथूनच तीन अज्ञातांनी त्याचे अपहरण करून त्याला तीन दिवस चेन्नईला अज्ञात स्थळी कोंडून ठेवत १० लाख रुपयांची मागणी अपहरणकर्त्यांनी त्याच्याकडे केली मात्र, नौदल अधिकारी दुबे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दुबेनां कारमधून ५ फेब्रुवारीला महाराष्ट्र-गुजरात सीमेलगतच्या तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात सकाळी नऊच्या सुमारास आणले. त्यानंतर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिघांनी अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले
जंगलात विवस्त्र होरपळलेल्या अवस्थेतील व्यक्तीला पाहिल्यावर स्थानिकांनी घोलवड पोलीस ठाण्या अंतर्गत वेवजी पोलीसांना याबाबत माहिती दिल्याने त्वरित दुबेना डहाणूच्या आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु, अधिक उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले, तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीन अज्ञात अपहरणकर्त्यांविरुद्ध घोलवड पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३६४, ३९२ आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.