‘पक्षप्रवेशासाठी १०० कोटींची व मंत्रिपदाची ऑफर होती’ आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना यांना भाजपकडून १०० कोटींची ऑफर दिली गेली असल्याचा धक्कादायक दावा खुद्द शशिकांत शिंदे यांनीच केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपकडून हे दावे फेटाळले गेले असले, तरी यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून भाजपला टार्गेट करण्याची आयती संधी चालून आल्याचं सांगितलं जात आहे. या मुद्द्यावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली, तरी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र शशिकांत शिंदे यांचा हा दावा फेटाळला आहे.
‘भाजप प्रवेशासाठी मलाही १०० कोटी आणि मंत्रिपद अशी ऑफर होती’ असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच ही ऑफर दिल्याचं ते म्हणाले आहेत. ‘तुम्ही आत्ता राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये यावं. भाजपकडे मंत्रिपदाच्या जागा रिक्त आहेत. तुम्हाला आम्ही मंत्री करू. हे करताना पोटनिवडणूक जरी लागली, तरी त्यासाठी आम्ही १०० कोटी खर्च करू असं देखील मला सांगण्यात आलं होतं. मी ती ऑफर नाकारली. नंतर जिल्ह्यातले अनेक लोकं जात असताना उदयनराजे देखील गेले. तेव्हा मला पुन्हा तसा निरोप पाठवला. भविष्यकाळात मोठी संधी दिली जाईल, असं देखील सांगण्यात आलं होतं’, असं शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.
दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. ‘शशिकांत शिंदे यांनी केलेलं वक्तव्य निराधार आहे. पक्षात येण्याविषयी बोलणं होऊ शकतं. पण १०० कोटींची ऑफर दिली जाणं अशक्य आहे. निष्ठेच्या बाबतीत शशिकांत शिंदे शरद पवार आणि.. असं बोलून थांबले. अजित पवारांचं नाव घेण्याचं धारिष्ट्य त्यांच्या वक्तव्यात दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून १०० कोटींची ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली नसेल, अशी मला खात्री आहे’, असं ते म्हणाले.