आता नवं संकट ! जळगाव सह रत्नागिरीत सापडले सर्वाधिक डेल्टा प्लस रुग्ण
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। स्था कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रासमोर आता नवं संकट उभं ठाकलं आहे. महाराष्ट्रात आता डेल्टा प्लस व्हेरिएंटची 21 प्रकरणं आढळून आली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.
राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 21 रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील 9 रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील 7, मुंबई 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे.या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे 7500 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
या संदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील 100 सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सी एस आय आर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. 15 मे पासून 7500 नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे 21 केसेस आढळून आले आहेत. या केसेससंदर्भात पुढील कार्यवाही अशी करण्यात येत आहे की या इंडेक्स केसेसची संपुर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झालं होतं का, त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का याबाबत माहिती घेऊन त्यांच्या निकट सहवासिताची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचं जे म्युटेशन झालं आहे त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे.
डेल्टा प्लस हा डेल्टा किंवा ‘बी1.617.2’ याचंच रौद्र रुप आहे. हा व्हेरियंट पहिल्यांदा भारतातच आढळला होता आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी हाच जबाबदार होता. व्हायरसच्या या नव्या प्रकारामुळे कोरोना किती घातक होऊ शकतो, याचा अंदाज अद्याप लावता आलेला नाही. भारतात नुकतंच मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धतीला परवानगी मिळाली आहे. मात्र, ही पद्धतचही डेल्टा प्लसपुढे निष्प्रभ ठरत असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीतील सीएसआयआर- इन्स्टिट्युट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे (IGIB) शास्रज्ञ विनोद स्कारिया यांनी रविवारी याबद्दल ट्विट केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं,‘ हे म्युटेशन स्पाईक प्रोटीन SARS-CoV-2 मध्ये म्युटेशन झाल्यामुळे माणसाच्या शरीरातील पेशींमध्ये तो प्रवेश करू शकतो. सध्या भारतात K417N ची व्हेरिएंट फ्रीक्वेन्सी फार नाही. हे सिक्वेन्सेस प्रामुख्याने युरोप, आशिया आणि अमेरिकामध्ये सापडले आहेत.’ या वर्षी मार्चमध्ये पहिला सिक्वेन्स युरोपमध्ये सापडला होता.