शिंदे गटातील १२ अस्वस्थ आमदार आमच्या संपर्कात, राऊतांचा खळबळजनक दावा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। शिंदे-फडणवीस सरकारचा गेल्या ४० दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अवघ्या काही तासांवर राहिलेला असताना शिवसेना नेते विनायक राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, शिंदे गटातील १२ आमदार संपर्कात असल्याचा दावा विनायक राऊतांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना सोमवारी रात्री राऊतांनी हा दावा केला आहे.
राऊत म्हणाले की, “ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही, मग ते अब्दुल सत्तार असतील किंवा इतर कोण असतील हे सर्व आता एकमेकांच्या उरावर बसण्यास सुरूवात करतील. त्यामुळे हे मंत्रिमंडळ औटघटकेचं मंत्रिमंडळ असेल यात कोणतीही शंका नाही,” अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली. त्यांनी माध्यमांशी साधललेल्या संवादादरम्यान शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला. “सध्या काही जण अस्वस्थ आहेत आणि त्यापैकी १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत,” असा दावाही राऊत यांनी केला.
आज सकाळी ११ वाजता राजभवन येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात शिंदे गटाकडून उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, शंभूराज देसाई आदींना मंत्रीपद मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तर, भाजपकडून ११ जण शपथ घेणार आहेत यामध्ये चंद्रकांत पाटील, राधा कृष्ण विखे पाटील, सुधीर मुनंगटीवार, गिरिष महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित आदी नऊ नावं निश्चित झाली आहेत. उर्वरित दोन नावांमध्ये एक महिला आमदार शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदापासून लांब ठेवल्यानंतर त्यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी असेल, यावरून अंदाज वर्तविणे सुरू होते. फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ खात्याची जबाबदारी येण्याची दाट शक्यता आहे. वजनदार खाती फडणवीस यांच्याकडे ठेवून एकप्रकारे सरकारवरच ‘कंट्रोल’ ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.