भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

शिवसेनेचे १४ खासदार वेगळा निर्णय घेणार? शिंदेंशी जुळवून घ्या, उद्धव ठाकरेंना आग्रह

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदारांनी बंड पुकारल्याने शिवसेनेत प्रचंड खळबळ उडाली आहे. या बंडामुळे केवळ शिवसेनेत फूट पडली नाही तर राज्यातील आघाडी सरकार कोसळलं. ठाकरे कुटुंबातील पहिल्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. इतकेच नाही तर राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपने मास्टरस्ट्रोक लगावला आहे. त्यामुळे शिवसेनेत संभ्रम आणि एकाचवेळी भाजपबाबत सहानुभूती निर्माण झाली आहे. शिंदे यांच्या बंडामुळे पक्षाची पूर्णपणे वाताहात झाल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावे, असं शिवसेनेच्या खासदारांना वाटत आहे. तशी इच्छाही या खासदारांनी उद्धव ठाकरे यांना बोलून दाखवल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय १४ खासदार वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. यावेळी खासदार आणि ज्येष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदेंशी जुळवून घेण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला आहे, असं सूत्रांनी सांगितलं. तर शिंदे यांच्या संपर्कात शिवसेनेचे १४ खासदार असल्याचा दावाही करण्यात येत आहे.

गवळी, विचारेंची दांडी
शिवसेनेकडे एकूण १९ खासदार आहेत. त्यापैकी तीन खासदार कालच्या बैठकीला गैरहजर होते. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे, भावना गवळी आणि ठाण्यातील खासदार राजन विचारे या बैठकीला आले नाहीत. श्रीकांत शिंदे यांनी उघडपणे आपल्या वडिलांना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तर यवतमाळमधून पाचवेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून हिंदुत्वाबाबत बंडखोरांनी जी भूमिका मांडली आहे, त्यावर विचार करण्याचं आवाहन केलं होतं. ठाण्यातील खासदार राजन विचारे हे सुद्धा शिंदे यांना मानणारे आहेत. त्यामुळे तेही बैठकीला गैरहजर होते.

खासदारांना नेमकी कोणती भीती?
भावना गवळी यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. त्याही ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या एका सहकाऱ्याला ईडीने अटकही केलेली आहे. तर, शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे हे बंडखोर आमदारांसोबत गोव्यात आहेत. आपल्या मतदारसंघातील आमदार शिंदे यांच्या गटात आहेत. त्यामुळे खासदारांची कोंडी झाली आहे. हे बंडखोर आमदार शिवसेनेत आले नाही तर निवडणुकीत मोठा फटका बसण्याची भीती या खासदारांना वाटत आहे. त्यामुळे शिंदे गटाशी जुळवून घेण्याचं हे खासदार सांगत आहेत. यातील १४ खासदार वेगळा निर्णय घेण्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केल्याचा वृत्त आहे.

आम्ही ठाकरेंसोबतच। आमदारांच्या बंडाचा शिवसेनेच्या संसदीय दलावर काहीच परिणाम होणार नाही, असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. तर मी उद्धव ठाकरेंसोबतच आहे. त्यामुळे त्यांच्या आदेशानुसारच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणार असल्याचं उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!