शिंदे गटाचे २२ आमदार, ९ खासदार आमच्या संपर्कात, ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ
मंडे टू मंडे न्युज। शिंदे गटातील आमदार आणि खासदारांबद्दल खळबळजनक दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. . शिंदे गटातील २२ आमदार आणि ९ खासदार संपर्कात असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. राऊत यांनी त्यांची बाजू मांडताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत, मंत्री शंभूराज देसाई आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची नावं घेतली आहेत.
मंत्री शंभूराज देसाई यांना काय करायचे ते करु द्या, एक मात्र नक्की की, शिंदे गटामध्ये गेलेले बऱ्याच आमदारांमध्ये असंतोष खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या असंतोषाला पहिली वाचा ही गजानन कीर्तिकर यांनी फोडली आहे. असे अनेक आमदार आहेत की ज्यांचा भ्रमनिरास झाला आहे. ५० खोके आणि कोट्यावधी रुपयांचा निधी देण्याचे कबूल करण्यात आले, पण आता तसं काही घडताना दिसत नाही.
काही जणांना टोकन दिलंच नाही तर कोट्यावधी रुपयांची कामं मात्र चार- पाच मंत्री सोडले तर बाकीच्यांना सर्वांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत. त्यामुळे सर्वांनाच असं वाटत की, आम्हाला फसवलेलं आहे आणि आपल्याला परतीचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. अशा भावना बऱ्याच जणांमध्ये आहेत, म्हणून या मधील सुरवात गजानन कीर्तीकर यांनी केली आहे. त्यामुळे आम्ही योग्य वेळेला जाहीर करु, असं विनायक राऊत म्हणाले .
शंभूराज देसाईंचं स्पष्टीकरण
खासदार विनायक राऊत यांनी माझ्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे, असं केलेलं वक्तव्य हे धादांत खोटं आहे, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी दोन दिवसांत आपलं म्हणणं मागे घेतलं नाहीतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री देसाई बोलत होते.