कांग्रेसचे ३० आमदार फुटणार? राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंम्प? उपमुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्याने खळबळ
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राजकारणात केव्हा काय घडेल हे सांगता येत नाही. “शेवटी ज्याला कुठे न्याय मिळत नाही, त्याला आम्हाला न्याय द्यावा लागतो”, असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता म्हणून विजय वडेट्टीवार यांची आज विधानसभेत अधिकृतपणे नियुक्तीची घोषणा करण्यात आली. वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना भाजप प्रवेशासाठी अप्रत्यक्षपणे ऑफर दिली. २०१९ मंत्रीपदासाठी, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून आणि त्यानंतर विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेसकडून आमदार संग्राम थोपटेंचं नाव चर्चेत होतं.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यानंतर आता काँग्रेसमध्येदेखील तशीच घटना घडते का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या चर्चांना आणखी खतपाणी घालणारं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
तीनही वेळा काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना हुलकावणी मिळाल्याने, वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाच्या ठरावा दरम्यान बोलताना, “आता संग्राम भाऊंच कायं होणार, त्यांचं असं नेहमी का होत?”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सवाल उपास्थित केला.
“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडलं त्यावेळी आम्ही शेवटपर्यंत ऐकत हेातो की, विधानसभेचे अध्यक्ष संग्राम थोपटे होणार, संग्राम यांचे नाव येणार. संग्रामभाऊंची चिठ्ठी झालीय, चिठ्ठी निघालीय, चिठ्ठीवर सही झालीय, चिठ्ठी दिल्लीवरून सुटलीय, पण त्यांच्या नावाची चिठ्ठी डिस्पॅच होता होता कुठे अडते, हे कळत नाही”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
संग्राम थोपटे यांना काँग्रेसकडून डावलण्यात येत असल्याबाबत देवेंद्र फडणवीसांकडून यावेळी भाष्य करण्यात आलं. काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी असल्याने काँग्रेसचा एक मोठा गट फुटणार अशी चर्चा असतानाच फडणवीसांच्या भाष्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता संग्राम थोपटेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेसमधील ३० आमदारांचा गट फुटणार?
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यानंतर आता महाराष्ट्रात काँग्रेस पक्षातही मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी संग्राम थोपटे विराजमान व्हावेत यासाठी काँग्रेस हायकमांडला ३० आमदारांचे पत्र गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये या मुद्द्यावरु धुसफूस उद्भवण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. अशा चर्चा सुरु असतानाच आज देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरुन संग्राम थोपटे यांना भाजपासोबत येण्याची खुली अप्रत्यक्ष ऑफर दिली आहे.