आज पासून एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महिलांना एसटी प्रवास सुलभरित्या करता यावा याकरता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून एसटी प्रवासात महिलांना तिकिटदरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे महिला अवघ्या निम्म्या तिकिटदरात प्रवास करू शकणार आहेत. सरसकट सर्व वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु, सरकारने सवलत देताना काही नियम आणि अटीही लागू केल्या आहेत. शासन आदेशात हे नियम नमूद करण्यात आले आहेत.
हे आहेत नियम
● साधी, मिडी/मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत, शयन-आसनी, शिवशाही (आसनी), शिवाई (साधी आणि वातानुकुलीत) इतर बसेसमध्ये महिलांना आजपासून तिकिटदरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसंच, राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेससाठी ही सवलत लागू असेल.
● ही सवलत महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असेल. म्हणजे, राज्यांतर्गत प्रवासासाठीच महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे. आंतरराज्यीय प्रवासात महिलांना पूर्ण तिकिट दर आकारला जाणार आहे.
● ग्रामीण भागातील महिलांना या सवलतीचा सर्वाधिक फायदा होणार आहे. परंतु, ही सवलत शहरी भागात लागू नसेल, असंही शासन आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
● तिकिट दरात ५० टक्के सवलत आजपासून लागू करण्यात आल्याने याआधी ज्या महिला प्रवाशांनी आगाऊ बुकींग केली असेल त्यांना ५० टक्के सवलतीचा परतावा मिळणार नाही. आजच्या तारखेनंतर ज्या महिला प्रवासी आरक्षण करतील त्यांना ५० टक्क्यांची सवलत मिळेल.
● संगणकीय आरक्षण, विंडो बुकिंग, ऑनलाईन, मोबाईल अॅपद्वारे, संगणक आरक्षणाद्वारे तिकिट घेतले जातात. यासाठी कर आकारला जातो. त्यामुळे अशापद्धतीने तिकिट घेणाऱ्या प्रवाशांकडून सेवाप्रकार निहाय लागू असलेला आरक्षण आकार वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे ५० टक्के सवलत असली तरीही आरक्षण आकार भरावा लागणार आहे.
● ५० टक्के सवलत देण्यात आली असली तरीही वातानुकुलित सेवांकरता वस्तू आणि सेवाकर रक्कम आकारला जाणार आहे.
● ६५ ते ७५ वयोगटातील महिलांना महिला सन्मान योजना हीच सवलत लागू राहील.
● तर, ५ ते १२ वयोगटातील मुलींना यापूर्वीप्रमाणे ५० टक्के सवलत कायम राहणार आहे.