महाराष्ट्रात आगामी काळात होणार लोकसभेचे ४८ ऐवजी ८२ मतदारसंघ, देशातील पाचवं सीमांकन होणार?
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रविवारी नवीन संसद भवनाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धाटन केले. या उद्धाटनानंतर आता देशात आगामी काळात अनेक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वप्रथम तर नवीन सीमांकनाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघाची हद्द ठरवण्यात येते. मात्र, गेल्या ५२ वर्षांपासून सीमांकन झालेले नाही. परंतु, २०२६ मध्ये नव्याने सीमांकन होणार आहे. त्यामुळे सध्याच्या लोकसंख्येचा विचार केला असता आगामी काळात होणाऱ्या नव्या सीमांकनामुळे लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढणार आहे.
लोकसभा मतदार संघांची संख्या वाढणार असल्याने महाराष्ट्रात असलेल्या ४८ लोकसभा मतदारसंघांची संख्या ८२ वर पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, याआधी १९७६ मध्ये लोकसभा मतदारसंघांचे सीमांकन झाले होते. त्या सीमांकनाच्या आधारावर लोकसभेचे ५४३ मतदारसंघ निश्चित करण्यात आले होते. १९७६ मध्ये देशाची लोकसंख्या ५४ कोटी इतकी होती. त्यावेळी दहा लाख लोकसंख्येमागे एक लोकसभा मतदारसंघ अशी आखणी केली गेली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले. त्यावेळी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी आगामी काळात लोकसभेच्या जागा वाढणार असल्याचे सांगितले. त्याला राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह तसेच खासदार सुशील मोदी यांनीही दुजोरा दिला. नव्या संसद भवनामध्ये ८८८ खासदार बसू शकतील अशी व्यवस्था आहे. त्यामुळे त्यानुसारच नवे सीमांकन करावे लागणार आहे. दहा लाखांचा आधार धरला तर प्रत्येक राज्यातील लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या ८० खासदार आहेत ते वाढून १४७ होतील. ८८८ मतदारसंघ बनवायचे असतील तर सुमारे १६ लाख लोकसंख्येमागे एक मतदारसंघ असे समीकरण ठेवावे लागणार आहे.
दरम्यान, २०११ च्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या १२१ कोटी इतकी नोंदली गेली. २०२१ ची जनगणना अजून झालेली नाही. सध्या देशाची लोकसंख्या १४२ कोटींवर पोहोचल्याचे सांगितले जाते. दहा लाख लोकसंख्येमागे एक मतदारसंघ असे गणित केले तर या लोकसंख्येप्रमाणे देशात १२१० लोकसभा मतदारसंघ होतील.
आतापर्यंतचे सीमांकन
१९५२ मध्ये पहिले सीमांकन झाले. त्यावेळी ४९४ लोकसभा मतदारसंघ ठरले.
१९६३ मध्ये दुसरे सीमांकन झाले. खासदारांची संख्या ५२२ झाली.
१९७१ मध्ये तिसऱ्या सीमांकनानंतर खासदार ५४३ झाले.
२००२ मध्ये सीमांकन झाले पण संख्या कायम राहिली.