मोठा दिलासा; महाराष्ट्रावरील वीजसंकट टळलं, वीजपुरवठा थांबवण्याचे आदेश मागे
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सणासुदीच्या दिवसात महाराष्ट्र राज्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रावर असणारं वीजसंकट आता टळलं आहे. महाराष्ट्राचा वीजपुरवठा थांबवण्याबाबतचे आदेश पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडनं अर्थात पोसोकोने मागे घेतले आहेत. त्यामुळं सणासुदीच्या काळात महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, थकबाकी न भरल्यामुळं पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडनं वीजपुरवठा थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता हे आदेश मागे घेण्यात आले आहेत.
महाराष्ट्र, तामिळनाडूसह १३ राज्यांवर ५ हजार कोटींची थकबाकी आहे. त्यामुळं या १३ राज्यांना आता वीज खरेदी करता येणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी असलेल्या पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (POSOCO) वीज पुरवठा करणाऱ्या इंडिया एनर्जी एक्सचेंज, पॉवर एक्सचेंज ऑफ इंडिया आणि हिंदुस्थान पॉवर एक्सचेंज या कंपन्यांना ५००० कोटींहून अधिक वीज बिल थकित असलेल्या १३ राज्यांना वीज पुरवठा करु नका असा आदेश दिला होता. मात्र, लगेच हा निर्णय बदलला आहे. महाराष्ट्रात वीजपुरवठा थांबवण्याबाबतचे आदेश मागे घेण्यात आले आहेत.
या राज्यांकडे थकबाकी
वीज बिल थकित असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे. केंद्रीय वीज मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पोसोको या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीच्या आदेशामुळे राज्यांना वीज खरेदी करता येणार नव्हती. त्यामुळं सणासुदीच्या काळात वीजेचं संकट निर्माण झालं होतं. मात्र, हा निर्णय मागं घेतल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.