मोठा गौप्यस्फोट ; एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार हे बंडाच्या एक महिना आधीच ठरलं होतं, हे फक्त अमित शहांनाच माहिती होत..
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ठाकरे सरकार पाडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार हे बंडाच्या एक महिना आधीच ठरलं होतं. ठाकरे सरकार पाडायचे आहे याची माहिती फक्त देवेंद्र फडणवीस यांना होती. पण शिंदेच मुख्यमंत्री होणार हे केंद्रीय अमित शाह यांना माहिती होतं, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी शुक्रवारी केला.
मी मुख्यमंत्री होणार असे स्वतः एकनाथ शिंदे मला म्हणाले होते, असा धक्कादायक दावा करत आमदार नितीन देशमुख म्हणाले, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा सात महिन्यांतच सत्तांतराच्या हालचाली सुर झाल्या होत्या. त्याची कुण कुण लागली होती. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटतील याचा अंदाज आला नाही. २० ते २२ आमदार जातील आणि त्याचा सरकारवर काही परिणाम होणार नाही, असं आम्हाला वाटतं होतं. नितीन देशमुख म्हणाले, शिवसेनेतील सर्व ज्येष्ठ नेते आधीपासून शिंदे यांच्यासोबत होते. गुलाबराव पाटील सांगतात आम्ही नंतर शिंदे सोबत गेलो. पण तसं नाही. हे सर्व वरिष्ठ नेते आधीपासून संपर्कात होते. आम्ही शेवटी गेलो, असं चित्र त्यांनी दाखवलं. प्रत्यक्षात वरीष्ठ नेतेच सत्तातंराचे मुख्य सुत्रधार होते.
सत्तांतराची कुणकुण लागल्यानंतर कैलास पाटील आणि माझ्यात चर्चा झाली होती. उद्धव ठाकरे यांना हे सर्व कसं सांगायचं हे कळत नव्हतं. कारण सत्तातंराचा सापळा दीड दोन वर्षांपासून रचला जात होता. मुळात अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांचा हिंदुत्त्वाशी काहीही संबंध नाही. बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा हा त्यांचा बनाव. देवेंद्र फडणवीस कधीच माझ्या जिल्ह्यात दिसले नाहीत. दंगली झाल्या, महिलांवर अत्याचार झाले तरी फडणवीस आले नाहीत. फक्त पक्षाची सभा घेण्यासाठी फडणवीस यायचे, असे नितीन देशमुख यांनी सांगितले.
मातोश्री सोबत प्रामाणिक न राहिलेले शिंदे आमच्यासोबत काय प्रामाणिक राहणार
आमदार कैलास पाटील म्हणाले की, काही आमदारांची आधीपासूनच जुळवाजुळव सुरु होती. आपण उद्धव ठाकरेंना तयार करु. आपण भाजपसोबत जाऊ, अशी काही आमदारांची चर्चा सुरु होती. पण मी आणि नितीन देशमुख यांनी ठरवलं होतं की, काहीही झालं तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायची नाही. जे शिंदे मातोश्री सोबत प्रामाणिक राहिले नाहीत. ते आमच्यासोबत काय प्रामाणिक राहणार, असा सवालही कैलास पाटील यांनी केला. तलासरीला जो चेक पोस्ट आहे तिथे गाड्या थांबल्या. त्यांनी सांगितलं येथून आपल्याला चालत पुढे जायचं आहे. ती संधी साधली आणि त्यांच्यापासून दूर एक दीड किलोमीटर पुढे चालत आलो. उद्धव ठाकरे यांना फोन लावला आणि त्यांना सगळा प्रकार सांगितला. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका टू व्हीलर वर बसलो आणि पुढे पुढे येत राहिलो.
सकाळच्या शपथविधीनंतर शिवसेनेचे आमदार आघाडीसोबत जाण्यास आग्रही होते
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळी शपथविधी झाला आणि सर्व चित्रच बदलले. तो शपथविधी बघितल्यानंतर शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले. आमदारांनी उद्धव ठाकरे यांना आग्रह केला की, काहीही करा पण महाविकास आघाडीसोबत आपली सत्ता आणा. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्तेचा निर्णय झाला, असे देशमुख यांनी सांगितले.