भाजपाच्या मिशन १४४ वर शिंदे गटाचे गुलाबराव पाटलांचं मोठं विधान
मुंबई,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। भाजपच्या मिशन महाराष्ट्रला चंद्रपूरमधून सुरूवात झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपने २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुकलं आहे. भाजपने महाराष्ट्रासाठी मिशन १४४ ची घोषणा केली आहे,
भाजपच्या या मिशन बाबत शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.’भाजपाचे मिशन १४४ आहे मात्र बाळासाहेबांची शिवसेना व भाजप आमची युती असणार आहेत. यात युतीचे नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील. यामध्ये शून्य जागा जरी लढवायला लागल्या तरी ते आम्हाला मान्य राहील फक्त शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश करावे’ असं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपच्या लोकसभा मिशन वरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली होती. मात्र संजय राऊत यांच्या म्हणण्याला मी भाव देत नाही. कुणीतरी मागच्या दरवाज्याने येणाऱ्या माणसाने हे म्हणावं आणि त्याला आपण मान्यता द्यावी, अशी टीका देखील गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर केली.