विदेशी महिलेचा सेल्फी काढण्याच्या नावाखाली विनयभंग, मग कोर्टानं काय शिक्षा दिली हे बघाच..
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। विदेशी महिलेच्या रूममध्ये घुसून सेल्फी काढण्याच्या नावाखाली तिचा विनयभंग करणाऱ्या हॉटेल मॅनेजरला कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पेरूची नागरिक असलेल्या महिलेसोबत गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात माझगाव कोर्टाने अवघ्या दोन महिन्यात हा निकाल दिला आहे.
भारत फिरायला आलेल्या महिलेसोबत आरोपी रियाझ अहमद राजू अहमद याने गैरवर्तन करत तिच्या विनयभंग केला होता. दोन महिन्यांपूर्वी २६ मार्च रोजी हॉटेल वेलकम येथे ही घटना घडली होती. या प्रकरणात मुंबई मधील भायखळा पोलिसांनी गुन्हा घडल्याचा अवघ्या २४ तासात आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
दोन महिन्यांपूर्वी पेरू येथील पर्यटक महिला भारत फिरण्यासाठी आली होती. येथे ती हॉटेल वेलकम येथे थांबली होती. परंतु तेथील हॉटेल मॅनेजर असलेल्या आरोपीने मदतीच्या नावाखाली या महिलेच्या रूममध्ये प्रवेश केला आणि सेल्फी काढण्याच्या नावाखाली महिलेशी जवळीक साधून तिचा विनयभंग केला.
पीडित महिलेला केवळ स्पॅनिश भाषा येत होती. त्यामुळे तिने हॉटेलमधील दुसऱ्या एका स्पॅनिश भाषा येत असलेल्या गेस्टची मदत घेतली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गूगल ट्रांसलेटरच्या मदतीने महिलेशी संवाद साधला आणि तिची तक्रार नोंदवून घेतली.
पीडित महिलेचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी विनयभंग केल्या प्रकरणी हॉटेलच्या मॅनेजरला अटक केली. आरोपी मॅनेजर त्याचे उत्तर प्रदेशमधील मूळ गाव वजीरगंज येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि एका दिवसात आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. तसेच न्यायालयाला विनंती करून महिलेची साक्ष देखील नोंदवण्यात आली होती.
यानंतर अवघ्या दोन महिन्यात माझगाव न्यायालयाने आरोपीला २ वर्षांची शिक्षा आणि ५००० रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास तीन महिन्यांची कैदेची दिली शिक्षा आरोपीला देण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा