अयोध्येतील राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशभरात अर्ध्या दिवसाची सुट्टी
मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। आतांची एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदीराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी २२ जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, केंद्र सरकारची सर्व कार्यालये अर्धा दिवस बंद राहतील. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार,२२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या अभिषेक समारंभात सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी केल्यानंतर केंद्राने देशातील केंद्र सरकारी आस्थापने अर्ध्या दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत केंद्र सरकारने एक अधिसूचनाही जारी केली आहे. यात म्हटले आहे की, ”२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेविषयी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली उत्साह भावना आणि त्या सोहळ्यात सहभागी होण्याच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने देशातील केंद्र सरकारच्या आस्थापना अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.”
यात पुढे सांगण्यात आलं आहे की, ”केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापना दुपारी २:३० वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद राहतील.” अयोध्येत होत असलेल्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासोबतच त्याच वेळी भारतात आणि परदेशात विविध ठिकाणी विविध संघटना आणि समुदायांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या संपूर्ण सोहळ्याच्या थेट प्रसारणाची व्यवस्था राष्ट्रीय प्रसारक दूरदर्शनने केली आहे. जे प्रसारण विविध खाजगी टीव्ही वाहिन्यांवरूनही थेट दाखवले जाणार आहे. अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रसारण मोठ्या पडद्यांवर पाहण्यासाठी भारतात आणि परदेशात सार्वजनिक ठिकाणी देखील व्यवस्था करण्यात आल्याचे ही या अधिसूचनेत सांगितले आहे.