एलसीबी चे बकाले व परिवहन अधिकारी शाम लोही वर कारवाई साठी आ.मंगेश चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव येथील एलसीबी चे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला बडतर्फ करावे तसेच चाळीसगाव RTO वसुली प्रकरणी जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याविरुद्ध कारवाईसाठी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची भेट घेत सविस्तर पत्र दिले.
या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलंबित पोलीस निरीक्षक बकाले याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे पोलीस महासंचालक यांना दिले आहेत. तर सर्वसामान्य ट्रक व वाहन चालक यांच्याकडून हफ्ते घेणाऱ्या चाळीसगाव येथील RTO वसुली प्रकरणात आमदार मंगेश चव्हाण यांनी आरोप केलेले राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही तसेच त्यांना अभय देणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी- कर्मचारी यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांना दिले आहेत.यावेळी मुख्यमंत्र्यांकडे RTO यांना हफ्ता देणाऱ्या १०० ट्रक व वाहन चालकांची यादी दिली असून त्यांचा जबाब घेतला जाणार आहे.
आपली लढाई ही कुठल्या व्यक्ती अथवा जाती विरोधात नसून अन्यायी, भ्रष्टाचारी व जातीयवादी प्रवृत्तीविरोधात आहे. या प्रवृत्तीमुळे गोर-गरीब, वंचित, पिडीत घटक यांच्यावर अन्याय होतो, त्यांचे शोषण होते. त्यामुळे यांना धडा शिकविण्यासाठी जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा पाठपुरावा सुरु राहील, – आमदार मंगेश चव्हाण चाळीसगाव