राज्यात पुन्हा राजकीय भूकंप, भाजप व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक नेता शरद पवार गटात जाणार
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठमोठे भूकंप घडले व घडतही आहेत,आणखी पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माढ्यात मोठी राजकीय उलटफेर होणार आहे. रामराजे निंबाळकर यांच्यासह भाजप नेते धैर्यशील मोहित पाटील हे देखील शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार गटाकडून संजीवराजे निंबाळकर किंवा धैर्यशील मोहिते पाटील यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडून माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्यांच्या उमेदवारीला धैर्यशील मोहिते पाटील आणि रामाराजे निंबाळकर यांचा विरोध होता. दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. भाजप आणि अजित पवार गटाकडून या दोन्ही नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नदेखील केले गेले. पण तरीही भाजप पक्षासाठी जे अनपेक्षित होतं तेच आता घडण्याची शक्यता आहे. हे डॅमेज कंट्रोल करणं भाजपला आता शक्य होतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते. त्यांनी जाहीरपणे आपली इच्छादेखील व्यक्त केली होती. पण पक्षाने विद्यमान खासदार रणजिंतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. विशेष म्हणजे त्यांची मनधरणी करण्यासाठी स्वत: मंत्री गिरीश महाजन अकलूजला गेले. त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण गिरीश महाजन यांच्यासमोर मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केलं.
माढ्यात मोठा राजकीय भूकंप होणार
दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज होते. यामुळे रामराजे आणि धैर्यशील मोहिते पाटील आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकाही पार पडल्या होत्या. या नेत्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींना भेटून नाराजीदेखील व्यक्त केली. पण तरीही उमेदवार बदलण्याचा निर्णय न झाल्याने आता माढ्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
शरद पवार गट कुणाला उमेदवारी देणार?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत माढ्याची जागा शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. शरद पवार गट या जागेतून धैर्यशील मोहिते पाटील किंवा संजीवराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी याबाबत खासगीत बोलताना माहिती दिली आहे. माढ्यात कुणाला उमेदवारी द्यावी याबाबत मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर कुटुंब एकत्रित निर्णय घेऊन कळवणार आहेत. पण संजीवराजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.